IND vs ENG : क्रिकेटची पंढरी म्हणवल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजानी धमाकेदार सुरुवात केली. दिवसाखेर भारताने केवळ तीन गडी गमावत 276 धावांपर्यंत मजल मारली आहे. पण या सर्वांत सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे सलामीवीर केएल राहुलचा (KL Rahul). राहुलने लॉर्ड्सच्या मैदानात शतक झळकावत इतिहास रचला आहे. कारण लॉर्ड्सच्या मैदानात शतक झळकावणे ही क्रिकेट विश्वातील एक मोठी गोष्ट आहे. सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर अशा दिग्गजांना न जमलेली कामगिरी राहुलने केली आहे.
राहुलने रोहितसोबत सलामीला येत उत्कृष्ठ फलंदाजी केली. त्याने तब्बल 212 चेंडू खेळल्यानंतर 9 चौकार आणि एक षटकार ठोकत शतक पूर्ण केलं. केएल राहुलने मार्क वुडच्या चेंडूवर चौकार ठोकत 100 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे मालिकेच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावातही त्याने 84 धावा केल्या होत्या. त्यामुळे संघात पुनरागमन झाल्यानंतर राहुलची कामगिरी उत्तम होताना दिसत आहे. हे राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक असून इंग्लंडच्या भूमितील दुसरे शतक आहे. राहुल इतिहासातील पाचवा भारतीय सलामीवीर आहे ज्याने इंग्लंडमध्ये एकाहून अधिक शतक ठोकले आहेत. राहुलसह सुनील गावस्कर, विजय मर्चेंट, राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांनी ही कामगिरी केली आहे.
केएल राहुल जवळपास दोन वर्ष कसोटी संघातून बाहेर होता. 2019 मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यात खराब प्रदर्शन केल्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर आता सलामीवीर शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यामुळे राहुलला संघात स्थान मिळालं. ज्यानंतर सामन्याच्या काही दिवसांआधी सलामीवीर मयांक अगरवाल दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं. या संधीचं सोनं करत राहुलने आपली धडाकेबाज कामगिरी सुरु केली आहे.
या धमाकेदार शतकामुळे केएल राहुलचं नाव लॉर्ड्स मैदानाच्या मानाच्या फलकावर कोरलं गेलं आहे. हा सन्मान मिळणारा तो नववा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी वीनू मकंड (1952), दिलीप वेंगसरकर (1979, 1982, 1986), गुंडप्पा विश्वनाथ (1979), रवि शास्त्री (1990), सौरव गांगुली (1996), अजित अगरकर (2002), राहुल द्रविड़ (2011) आणि अजिंक्य रहाणे (2014) यांनी भारतासाठी लॉर्ड्सवर शतक ठोकलं आहे. वेंगसरकर हे एकमेव भारतीय आहेत, ज्यांनी तीन वेळेस या ठिकाणी शतक ठोकलं आहे.
हे ही वाचा
IND v ENG: ‘या’ कारणामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्विनला संधी नाही, विराटने स्वत: केला खुलासा
(Indian Batter KL Rahul Smashes Test century at Lords Ground made history in India vs England 2nd test)