मुंबई : बरोबर एक वर्षांपूर्वी जगातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. संपूर्ण भारत देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात असताना धोनीने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा करताच लाखो क्रिकेट रसिकांना धक्का बसला, आजही तो दिवस आठवला की फॅन्सच्या काळजात धस्स होतं….! धोनीने आपल्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत भारताला अनेक रोमहर्षक विजय मिळवून दिले. आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताला विश्वविजेता बनवलं… भारतीय क्रिकेटला अनेक सोनेरी क्षण दाखवले… 15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास त्याने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली… वयाच्या 39 व्या वर्षी त्याने क्रिकेटला गुड बाय केलं…!
महेंद्रसिंग धोनीने ‘पल दो पल का शायर हूं’ या गाण्याच्या बॅकग्राऊंडसह त्याच्या खेळण्याच्या दिवसातील फोटोंचा स्लाइड शो सोशल मीडियावर पोस्ट केला. ‘धन्यवाद – तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दस खरंच मनापासून तुमचे आभार… संध्याकाळी 7.29 वाजल्यापासून मी निवृत्त झालो असं समजा…!
धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेट सोडले. तेव्हापासून तो फक्त वनडे आणि टी -20 खेळत होता. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धचा सेमी फायनल सामना धोनीच्या आयुष्यातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. टूर्नामेंटनंतर धोनीने सिलेक्टरला सांगितलं होतं की, ‘माझी संघात निवड करु नका’. अशा वेळी त्याच्या निवृत्तीबाबत बऱ्याच चर्चा झाल्या. अखेर 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली.
धोनीचा शेवटचा एकदिवसीय सामना 2019 च्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना होता. यामध्ये त्याने 72 चेंडूत 50 धावा केल्या. भारताला जिंकवून देण्याचा धोनीने आटोकाट प्रयत्न केला. जोपर्यंत धोनी खेळपट्टीवर होता तोपर्यंत संपूर्ण भारत देशालाच नव्हे तर जगाला विश्वास होता की हा सामना भारतच जिंकणार, परंतु मार्टिन गप्टिलच्या शानदार ‘थ्रो’वर धोनीची एक उत्तम इनिंग संपुष्टात आली. विशेष म्हणजे धोनी त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही धावबाद झाला होता.
धोनीने बांगलादेशविरुद्ध पदार्पण केलं होतं आणि खातंही न उघडता धावबाद झाला होता. धोनी 350 एकदिवसीय, 90 कसोटी आणि 98 टी -20 सामने खेळला. डिसेंबर 2004 मध्ये सुरु झालेल्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण 15 हजार धावा, 16 शतके आणि यष्टीरक्षणात 800 पेक्षा जास्त झेल घेतले.
हे ही वाचा :
Ind vs Eng : 13 नो बॉल, 15 मिनिटांची एक ओव्हर, क्रिकेटच्या पंढरीमध्ये बुमराहची लाजीरवाणी कामगिरी
पुजारा आणि अजिंक्य रहाणेला झालंय काय, कुठे चुकतात?, VVS लक्ष्मणने सांगितली ‘मिस्टेक’