मुंबई: भारतीय क्रिकेटसाठी पुढचे 24 ते 48 तास महत्त्वाचे आहेत. बीसीसीआयने नव्याने निवडलेल्या सिलेक्शन कमिटीवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. न्यूझीलंड सीरीजसाठी टीम निवड ही पहिली जबाबदारी आहे. त्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि अन्य सिनियर खेळाडूंच्या टी 20 क्रिकेटमधील भवितव्याबाबत निर्णय घेणं. पुढचा टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये होणार आहे. त्यासाठी रोहित-विराट शिवाय टीम बांधणी करण्याच लक्ष्य बीसीसीआयने ठेवलं आहे. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
बीसीसीआय पदाधिकारी काय म्हणाला?
“न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी त्या दोघांचा विचार होणार नाही. त्यांना वगळणं हा मुद्दा नाहीय. पुढे जाणं आणि भविष्यासाठी टीम बांधणी हे लक्ष्य आहे. सिलेक्टर्स याबद्दल अंतिम निर्णय घेतील. संबंधितांशी चर्चा करतील” असं टॉप बीसीसीआयने पदाधिकाऱ्याने सांगितलं.
न्यूझीलंडविरुद्ध सीरीजमध्ये किती सामने?
रोहित, कोहलीशिवाय भुवनेश्वर कुमार, आर.अश्विन आणि मोहम्मद शमीच्या भवितव्याबद्दल सुद्धा सिलेक्टर्स निर्णय घेतील. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज झाल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे आणि टी 20 सीरीज खेळणार आहे. विराट, रोहित न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये दिसतील. पण 27 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी 20 सीरीजचा भाग नसतील.
“चेतन शर्मा आणि त्यांची टीम न्यूझीलंड विरुद्ध टीम निवडेल. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजसाठी जी टीम आहे, त्यात फार बदल होणार नाही. पण टी 20 स्क्वॉडमध्ये काही प्रयोग होतील” असं बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.