PHOTO : बर्थ-डे बॉय सुर्यकुमारमध्ये कमालीचे बदल, 10 वर्षांपूर्वीचे फोटो मुंबई इंडियन्सने केले शेअर
आयपीएलमध्ये अप्रतिम प्रदर्शनामुळे सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या सूर्याने 2021 या वर्षांत भारतीय संघाच्या टी-20 संघासह वने-ड टीममध्येही स्थान मिळवलं. आता त्याची निवड टी-20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातही झाली आहे.
1 / 4
मोठ्या संघर्षानंतर मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलेल्या मुंबईकर सूर्यकुमार यादवचा (Suryakuamr Yadav) आज वाढदिवस. 14 सप्टेंबर, 1990 रोजी जन्माला आलेल्या सूर्याने 30 वर्षाच्या वयात भारतीय संघात स्थान मिळवले आहे. पण हे स्थान मिळवण्यासाठी त्याला फार संघर्ष करावा लागला. आयपीएलमध्ये कित्येक वर्ष उत्तम कामगिरी केल्यानंतर सूर्या भारतात निवडला गेला आहे. दरम्यान त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्स संघाने त्याचे 10 वर्षांपूर्वीचे आणि आताचे असे फोटो शेअर केले आहेत.
2 / 4
अवघ्या 12 वर्षांंचा असताना सूर्यकुमारला त्याच्या वडिलांनी क्रिकेट शिकण्यासाठी एल्फ वेंगसरकर अकादमीत घातलं. दिलीप वेंगसरकरांच्या हाताखाली तयार झालेला सूर्या मार्च 2010 मध्ये टी-20 संघातून मुंबईसाठी खेळला. यासोबतच स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण करत 9 महिन्यांतच प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सूर्याने आतापर्यंत 77 प्रथम श्रेणी सामन्यात 5 हजार 326, 101 लिस्ट ए सामन्यात 2 हजार 903 आणि 181 टी-20 सामन्यांत 3 हजार 879 धावा बनवल्या आहेत.
3 / 4
स्थानिक क्रिकेट गाजवत अखेर 2012 मध्ये सूर्याला आयपीएलमधून बुलावा आला. प्रथम मुंबई इंडियन्स संघात सामिल झालेला सूर्या दोन वर्षांनंतर म्हणजे 2014 ला कोलकाता नाइट रायडर्समध्ये गेला. त्याठिकाणी फिनिशर म्हणून खेळणाऱ्या सूर्याने पुन्हा 2018 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये समावेश केला. आता 2018 साली 512, 2019 मध्ये 424 आणि 2020 मध्ये 480 धावा करत सूर्याने धावांचा डोंगर रचला आहे. अशावेळी मुंबई इंडिन्सवने 2011-12 सालीचे सूर्याचे फोटो आणि आताचे असे फोटो पोस्ट केले आहेत.
4 / 4
आयपीएलमधील सततच्या अप्रतिम कामगिरीमुळे 2021 च्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्याची संघात निवड झाली. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवातच षटकाराने करत सूर्याने त्याच्या येण्याची डरकाळी फोडली. नुकताच जुलै 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यातून सूर्यकुमारने वनडे डेब्यू देखील केला. सूर्याने एकदिवसीय क्रिकेटसह टी20 सामन्यातही अर्धशतक ठोकलं आहे. आता त्याची निवड टी20 विश्वचषकासाठी झाली असून तो कशी कामगिरी करतो ते पाहावे लागेल.