लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधून उतरले आहेत. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि नंतर दिग्गज प्रशिक्षक असणारे वासु परांजपे (Vasoo Paranjape) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने असे केले आहे. वासू यांचे सोमवारी (30 ऑगस्ट) मुंबई येथे निधन झाले.
पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने चौथा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान भारतीय खेळाडूंनी काळी फित बांधत मैदानात उतरल्यानंतर त्यांचा फोटो बीसीसीआयने ट्विट केला आहे. त्याला कॅप्शन दिलं आहे की,’भारतीय संघ महान क्रिकेटपटू वासु परांजपे यांना श्रद्धांजली देण्यासाठी हातावर काळी पट्टी बांधून उतरत आहे.’
The Indian Cricket Team is sporting black armbands today to honour the demise of Shri Vasudev Paranjape.#TeamIndia pic.twitter.com/9pEd2ZB8ol
— BCCI (@BCCI) September 2, 2021
भारतीय संघाला मुंबईने अनेक हिरे दिले. यात सुनिल गावस्करांपासून तेंडुलकर ते आता रोहित शर्मा अशा अनेकांचा समावेश आहे. यातीलच एक सर्वात जुने खेळाडू म्हणजे वासु परांजपे. मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करत अनेक क्रिकेटपटूंचं भविष्य घडवलं. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा सारखी नावं सामिल आहेत. अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून वासु यांनी काम पाहिलं असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकही राहिले आहेत.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघानी दोन-दोन बदल केले आहेत. भारतीय संघात मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी शार्दूल ठाकूर आणि उमेश यादवला संधी दिली आहे. तर इंग्लंडच्या संघात सॅम करनच्या जागी ख्रिस वोक्स आणि जोस बटलरच्या जागी ओली पोप खेळणार आहे.
हे ही वाचा :
सुनिल गावस्कर ते सचिन तेंडुलकर पर्यंत अनेकांना घडवणारे वासु परांजपे कालवश, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
(Indian Players wore black band in 4th test at oval against england to give tribute to Vasoo Paranjape)