मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने काल या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. या स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या स्पर्धेत खेळणार नाहीय. पाठिच्या दुखण्याने बुमराह सध्या त्रस्त आहे. हर्षल पटेलला (Harshal Patel) सुद्धा संघात स्थान मिळू शकलेले नाही. तो सुद्धा सध्या दुखापतग्रस्त आहे. पण त्याशिवाय सुद्धा काही खेळाडूंना संघातून डच्चू दिला आहे. त्या बद्दल जाणून घ्या. संघात स्थान न मिळालेल्या क्रिकेटपटूंमध्ये इशान किशन एक आहे. इशानला वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजसाठी संघात स्थान मिळालं होतं. त्याला फक्त एका सामन्यात संधी मिळाली. पण त्यात इशान अपयशी ठरला.
श्रेयस अय्यरला सुद्धा संघात स्थान मिळालेलं नाही. वेस्ट इंडिज विरुद्ध पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत तो संघाचा भाग होता. तो फक्त एक अर्धशतक झळकवू शकला, त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आलं आहे. सध्या त्याला स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे. संजू सॅमसनलाही संघात स्थान मिळू शकलेलं नाही. वेस्ट इंडिज विरुद्ध तो दोन टी 20 सामने खेळला होता. पण तो निवड समितीला आपल्या कामगिरीने प्रभावित करु शकला नाही.
?#TeamIndia squad for Asia Cup 2022 – Rohit Sharma (Capt ), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (wk), Dinesh Karthik (wk), Hardik Pandya, R Jadeja, R Ashwin, Y Chahal, R Bishnoi, Bhuvneshwar Kumar, Arshdeep Singh, Avesh Khan.
— BCCI (@BCCI) August 8, 2022
अक्षर पटेलला सुद्धा संघात स्थान मिळालेलं नाही. तो विंडीज विरुद्ध दोन टी 20 सामन्यात खेळला. अय्यर प्रमाणे पटेलला सुद्धा स्टँडबायवर ठेवलं आहे. कुलदीप यादवला सुद्धा संघात स्थान मिळालेलं नाही. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजसाठी त्याची संघात निवड झाली होती. पाचव्या शेवटच्या सामन्यात त्याला संधी मिळाली. त्याने तीन विकेटही काढल्या. पण ही कामगिरी निवड समितीला प्रभावित करण्यासाठी पुरेशी ठरली नाही. आशिया कप मधलाच संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे.