U-19 WC Final : आज प्रत्येक भारतीयाला महिला क्रिकेट संघाचा अभिमान वाटतोय. कारण त्य़ांनी कामगिरीच तशी केलीय. आतापर्यंत जे झालं नव्हतं, ते भारतीय मुलींनी दक्षिण आफ्रिकेत करुन दाखवलं. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखील भारतीय महिला टीमने पहिल्या आयसीसी अंडर-19 महिला वर्ल्ड कपच जेतेपद मिळवलं. महिला क्रिकेटमध्ये भारताचा हा पहिला वर्ल्ड कप विजय आहे. या विजयानंतर सेलिब्रेशन होणं स्वाभाविक आहे. रविवारी फायनल सामना झाला. टीम इंडियाने इंग्लंडवर सात विकेट राखून विजय मिळवला. त्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं.
इंग्लंडची टीम 68 रन्सवर ऑलआऊट
भारतीय टीमने या मॅचमध्ये पहिली गोलंदाजी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. त्यांनी 68 रन्सवर इंग्लंडला ऑलआऊट केलं. टीम इंडियाने हे सोपं लक्ष्य तीन विकेट गमावून 14 व्या ओव्हरमध्ये गाठलं. त्यानंतर महिला टीममधील सर्वच सदस्यांनी डान्स करुन विजयाच सेलिब्रेशन केलं. तिरंगा झेंडा हाती घेऊन मैदानात सेलिब्रेशन केलं.
‘या’ गाण्यावर थिरकले खेळाडू
टीम इंडियाच्या खेळाडूंनी बॉलिवूडमधील प्रसिद्घ ‘काला चश्मा’ गाण्यावर डान्स केला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिन कैफने या गाण्यावर नृत्य केलं होतं. टीममधल्या सर्व महिला खेळाडू या गाण्यावर थिरकल्या. ऋषिता बासू-सौम्या तिवारी डान्समध्ये आघाडीवर होत्या. त्याशिवाय तितास साधु, पार्श्वी चोपडा यांची पावल सुद्धा थिरकली. टीम इंडियातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर या ऐतिहासिक विजयाचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांच्या डान्स स्टेप्स कॅटरिना आणि सिद्धार्थच्या तोडीच्या होत्या.
प्रेक्षकांना अभिवादन
विजयानंतर महिला टीम इंडियाने संपूर्ण मैदानात धमाल केली. बाऊंड्री लाइनवर या खेळाडूंनी प्रेक्षकांना अभिवादन केलं. ट्रॉफी उचलताना संपूर्ण टीमचा जोश, उत्साह पाहण्यासारखा होता. प्रत्येक खेळाडूने ट्रॉफीसोबत फोटो काढले.