तिरंगा फडकला… खेळ सोडला… 2024मधील क्रीडा क्षेत्रातील अभिमानाचे ‘ते’ क्षण

| Updated on: Dec 31, 2024 | 9:58 PM

2024 हे वर्ष भारतासाठी क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि दुःखाचे मिश्रण असलेले ठरले. टी-20 विश्वचषकाचा विजय, ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील पदके आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ऐतिहासिक यश हे वर्ष उज्ज्वल करणारे घटक होते. दुसरीकडे, अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली, ज्यामुळे भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

तिरंगा फडकला... खेळ सोडला... 2024मधील क्रीडा क्षेत्रातील अभिमानाचे ते क्षण
sports 2024
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सुरेश मोरे, प्रतिनिधी : भारताला 2024 या वर्षात क्रीडा क्षेत्रातून अनेक आनंदाचे क्षण पाहावयास मिळाले. तर काही भारतीय खेळाडूंनी कारकिर्दीतून निवृत्तीही जाहीर केली. आयसीसी टी-20 विश्वचषक, पॅरिस ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडसह जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा तिरंगा मोठ्या थाटात फडकला.

जागतिक पटलावर भारताचा तिरंगा फडकला

2007नंतर भारताने पुन्हा एकदा आयसीसी टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवत टी-20 विश्वचषक भारतात आणला. अंतिम सामन्यातील 76 धावांसाठी विराट कोहलीला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील एकूण 15 विकेटसाठी जसप्रीत बुमराह ला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार देण्यात आला. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. यावर्षी टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये एकूण 6 पदकं जिंकली. यामध्ये 1 रौप्य तर 5 कांस्य पदकांचा समावेश होता. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताला सिल्व्हर पदक मिळवून दिले. पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण 29 पदकं जिंकली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य तर 13 कांस्य पदकांचा समावेश होता.

45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने इतिहास रचला. महिला-पुरुषांच्या टीमने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले. पुरुष संघात पंतला हरिकृष्णा, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराती, डी. गुकेश आणि अर्जुन इरिगासी यांचा समावेश होता. तर महिला संघात तानिया सचदेव, वैशाली रेमशाबाबू, हरिका द्रोणवल्ली, वंतिका अग्रवाल आणि दिव्या देशमुखचा सहभाग होता.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डोम्माराजू गुकेशने इतिहासाला गवसणी घातली. विश्वनाथन आनंदनंतर देशाला दुसरा विश्वविजेता मिळाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुकेश सर्वात कमी वयात जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठरला. गुकेशने चीनच्या डिंग लीरेनचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावलं.

काही खेळाडूंचा कारकिर्दीला पूर्णविराम

दुसरीकडे काही खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. फुटबॉलपटू सुनील छेत्री, कुस्तीपटू विनेश फोगाट, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, क्रिकेटपटू आर. अश्विन आणि शिखर धवनने निवृत्तीचा निर्णय घेतला.

सुनील छेत्रीची निवृत्ती, भारतीय संघात पोकळी

फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं आपल्या 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला. त्यानं भारतासाठी 151 सामन्यात 94 गोल केलेत. क्रिस्टियानो रोनाल्डो 135 गोल, लिओनेल मेस्सी 112 गोल आणि अली दाईच्या 108 गोलनंतर भारताचा सुनील छेत्री चौथ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीनेभारतीय संघासाठी सर्वाधिक 4 हॅटट्रिक घेतलेली आहे. सुनील छेत्रीने निवृत्ती घेतल्याने भारतीय फुटबॉल संघात मोठी पोकळी निर्माण झाल्याचंही आता पाहायला मिळतंय.