मुंबई: भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राजने (Mithali Raj Retirement) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 1999 साली करीयर सुरु करणाऱ्या मितालने दोन दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) भारताचं प्रतिनिधीत्व केलं. मिताली भारतीय महिला क्रिकेट संघाकडून 232 वनडे आणि 89 T 20 चे सामने खेळली. तिने 12 कसोटी (Test) सामन्यातही देशाचं प्रतिनिधीत्व केलं. वनडेमध्ये मिताली राजने 7805 धावा, तर टी 20 मध्ये 2364 रन्स केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 699 धावा आहेत. मिताली राजच्या नावावर एकूण 8 शतकं आहेत. वनडेमध्ये 7 आणि कसोटीमध्ये 1 सेंच्युरी झळकावली. मिताली राजने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला. 26 जून 1999 रोजी डेब्यु मॅचमध्येच मितालीने शतक ठोकलं. मिताली आयर्लंड विरुद्ध 114 धावांची खेळी खेळली होती. हा सामना भारताने 161 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
मिताली राजने टि्वटरवर निवृत्तीची घोषणा करताना चाहते आणि हितचिंतकांचे आभार मानले. दुसरी इनिंग खेळण्यासाठी आपण सज्ज आहोत, असं मितालीने म्हटलं आहे. “टीम इंडियाची निळी जर्सी परिधान करणं आणि देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही सन्मानाची बाब आहे. मी माझ्या प्रवासात चढ-उतार अनुभवले. मागच्या 23 वर्षात मी बरच काही शिकले आहे. हा माझ्या आयुष्यातला सुंदर आणि संस्मरणीय काळ होता. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतेय” असं मिताली राजने म्हटलं आहे.
“मी जेव्हा-जेव्हा मैदानावर उतरले, तेव्हा-तेव्हा मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचं प्रयत्न केला. क्रिकेटचा निरोप घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आता टीम, युवा आणि प्रतिभावान खेळाडूंच्या हातात आहे. भारतीय क्रिकेटच भविष्य खूपच उज्वल आहे” असं मितालीने म्हटलं आहे. “मी बीसीसीआय आणि सचिव जय शहा यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानते. अनेक वर्ष संघाचं नेतृत्व करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. हा प्रवास इथेच संपलाय पण मला क्रिकेटची साथ सोडायची नाही. महिला क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी मला योगदान द्यायचं आहे” असं मितालीने म्हटलं आहे.