कोरोना महामारीमुळे अनेक क्रिकेट सामन्यांवर संकट आलं आहे. बरेच सामने आतापर्यंत रद्द झाले असून अनेक सामन्यांच्या तारखांमध्येही बदल झाला आहे. श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघातील कृणाल पंड्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे.
भारत-श्रीलंका मालिका तर सुरुवातीपासूनच कोरोनाच्या संकटाखाली आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंकन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यामुळे 13 जुलैला सुरु होणारे सामने 18 जुलैला सुरु करण्यात आले. त्यात आता कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा झाल्याने टी-20 मालिकेतील मंगळवारचा सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे.
तिकडे हजारो मैल दूर वेस्ट इंडिजमध्ये सुरु असेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांमध्येही कोरोनाने बाधा घातली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील नाणेफेक झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या एका सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्याची माहिती समोर आल्यामुळे सामना स्थगित केला गेला. त्यामुळे संपूर्ण मालिका उशीरा संपली.
वेस्टइंडिज संघातील कोरोनाच्या संकटामुळे वेस्टइंडीज आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेतही बदल करण्यात आले. पाकिस्तान 5 टी-20 आणि 2 कसोटी सामने 27 जुलैपासून होणार होते. पण कोरोनाच्या संकटामुळे 27 जुलैपासून होणाऱ्या या सामन्यांतील एक सामना रद्द करुन मालिका 4 सामन्यांची करण्यात आली आहे. 28 जुलैला पहिला सामना होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांसह सर्वांत मोठी स्थानिक क्रिकेट स्पर्धा असणाऱ्या आयपीएलमध्येही कोरोनाने शिरकाव केला होता. कोरोनामुळे 2021 ची आयपीएल 4 मे रोजी स्थगित करण्यात आली आहे. आता ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून युएईत होणार आहे.