नवी दिल्ली : टीम इंडिया लवकरच वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी टेस्ट आणि वनडे टीमची घोषणाही करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यात रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारताचा भरवश्याचा फलंदाज शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्याच्याकडे उपकर्णधारपद दिलं जाईल, अशी शक्यता होती. पण असं काहीच झालं नाही. त्यामुळे शुभमनच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. शुभमनकडे उपकर्णधारपद न दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. शुभमनवर भरोसा राहिला नाही की आणखी काही या मागचं कारण आहे? अशी चर्चा आता रंगली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. मात्र, कसोटी आणि वनडेसाठी दोन वेगवेगळे उपकर्णधार असणार आहेत. कसोटी सीरिजसाठी अजिंक्य राहणे उपकर्णधार असणार आहे. तर वनडे सीरिजसाठी हार्दिक पंड्या उपकर्णधार असणार आहे. शुभमन गिलबाबत बोलायचं झालं तर शुभमनचा फॉर्म चांगला आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. तरीही त्याला उपकर्णधारपदापासून वंचित ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
टेस्ट आणि वनडेच्या उपकर्णधारपदासाठी टीम इंडियाकडे पर्याय होता. अजिंक्य राहणे आणि हार्दिक पंड्या पर्याय असल्याने शुभमनला उपकर्णधारपद दिलं नसल्याचं सांगितलं जात आहे. रहाणे आणि पंड्याला टीम इंडियाचा कर्णधार म्हणून काम केल्याचाही अनुभव आहे. शुभमनकडे तो अनुभव नाहीये. याचाच अर्थ रोहित शर्माच्या गैरहजेरीत टीम इंडियाचा कर्णधार म्हणून रहाणे आणि पंड्या नेतृत्व करू शकतात.
शुभमन हा भविष्यातील टीम इंडियाचा चांगला कर्णधार किंवा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळू शकतो. मात्र, तूर्तास टीम इंडियाला शुभमनकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. शुभमनचं वय कमी आहे. त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणताही अतिरिक्त दबाव न टाकण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे. त्याने मुक्तपणे आपला नैसर्गिक खेळ खेळावा अशी टीम इंडियाची इच्छा आहे. त्यामुळेच त्याच्यावर कोणताही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे.