मुंबई: टीम इंडिया (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेत अनेक मोठे चेहरे खेळत नाहीयत. काहींना विश्रांती दिलीय, तर काही दुखापतीमुळे बाहेर आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत ( T 20 series) केएल राहुल (KL Rahul) कॅप्टन होता. सीरीज सुरु होण्याआधी त्याला ग्रोइनची दुखापत झाली. त्यामुळे त्याला संपूर्ण मालिकेला मुकाव लागलं. आधी राहुलला झालेली दुखापत सामान्य असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता त्याच्या इंजरीबद्दल जी बातमी येतेय, ती टीम इंडियासाठी झटक्यापेक्षा कमी नाहीय. टी 20 सीरीजमध्ये न खेळणारा राहुल आता इंग्लंड विरुद्ध एजबेस्टनमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात खेळेल का? या बद्दल साशंकता आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी सामना 1 ते 5 जुलै दरम्यान खेळला जाईल. हा कसोटी सामना भारतीय संघाच्या मागच्या सीरीजमधला एक भाग आहे. कोरोनामुळे ही कसोटी त्यावेळी रद्द करण्यात आली होती. केएल राहुल भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधारही आहे.
केएल राहुल सध्या बंगळुरुत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, त्याच्या दुखापतीचं स्वरुप अजून स्पष्ट नाहीय. तो कधी मैदानावर परतणार, या बद्दल सस्पेन्स कायम आहे. त्याच्या दुखापतीची अजून पूर्ण तपासणीही झालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, केएल राहुलचं एजबेस्टन कसोटीत खेळणं कठीण दिसतय. वनडे, टी 20 मध्ये त्याच्या खेळण्यावरही सस्पेन्स कायम आहे. याचाच अर्थ राहुलला झालेली दुखापत गंभीर असू शकते. तो वनडे, टी 20 मधूनही माघार घेऊ शकतो.
इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा पहिला ग्रुप 16 जूनला रवाना होणार आहे. दुसरा ग्रुप 20 जूनला जाईल. यात हेड कोच राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची नाव आहेत.
केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2022 च्या यशस्वी फलंदाजांपैकी तो एक आहे. त्याने 15 व्या सीजनमध्ये 600 पेक्षा जास्त धावा केल्या. पण सध्या तो दुखापतीच्या फेऱ्यात अडकलाय.