दुबई: सध्या दुबईत T20 लीग सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये रॉबिथ उथाप्पाची बॅट चांगलीच तळपतेय. तो खोऱ्याने धावा करतोय. मागच्यावर्षी रॉबिन उथाप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आता त्याने दुबईत फोर-सिक्सचा पाऊस पाडला. 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं. इतकी आक्रमक बॅटिंग करुनही रॉबिन उथाप्पा आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. रॉबिथ उथाप्पा सध्या दुबई कॅपिटल्सकडून इंटरनॅशनल टी 20 लीग खेळतोय. तो लीगमध्ये आतापर्यंत दोन मॅच खेळलाय. या दोन्ही सामन्यात त्याने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिलीय. दुबईत खेळण्याआधी मागच्यावर्षी आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.
दाखवून दिली बॅटची ताकत
सीएसकेकडून खेळल्यानंतर रॉबिथ उथाप्पा थेट दुबईत जाऊन मैदानात उतरला. दोन्ही सामन्यात त्याने आपल्या बॅटची धार अजूनही कमी झाली नसल्याचं दाखवून दिलं. दुबई कॅपिटल्ससाठी पहिल्या सामन्यात तो 43 धावांची इनिंग खेळला होता.
दमदार खेळूनही दुबई कॅपिटल्सचा पराभव
दुसऱ्या सामन्यातही रॉबिन उथाप्पाने आपला क्लास दाखवला. गल्फ जायंट्स विरुद्ध 46 चेंडूत 79 धावा फटकावल्या. उथाप्पाने 52 धावा अवघ्या 12 चेंडूत फटकावल्या. त्याने 10 चौकार आणि 2 सिक्स लगावले. इतकी वेगवान खेळी करुनही रॉबिन उथाप्पा आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. दुबई कॅपिटल्सचा 6 विकेटने पराभव झाला.
उथप्पावर जेम्स विंस पडला भारी
दुबई कॅपिटल्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात जायंट्सने 19 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 183 धावा केल्या. कॅपिटल्सकडून उथाप्पाशिवाय कॅप्टन रोव्हमॅन पॉवेलने 38 आणि सिकंदर रजाने नाबाद 30 धावा केल्या. जायंट्सकडून कॅप्टन जेम्स विंसने नाबाद 83आणि इरास्मुसने 52 धावा ठोकून टीमला विजय मिळवून दिला.