मुंबई : IPL 2021 च्या प्लेऑफमध्ये (Playoff) आता केवळ एक जागा शिल्लक आहे आणि या जागेसाठी दावेदार संघ तीन आहेत. बॉलिवूड चित्रपट शोलेमधील एक पात्र गब्बरच्या भाषेत बोलायचे झाल्यास, ‘ये बहुत नाइन्साफी है.’ पण इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाचे हेच वास्तव आहे. हाच थरार आहे. एका बाजूला तीन संघांनी प्लेऑफच्या 3 जागा पटकावल्या आहेत. प्लेऑफमधील पहिला संघ चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आहे. तर दुसरा संघ दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आहे. प्ले ऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनेदेखील (Royal Challengers Banglore) जागा पटकावली आहे. बंगळुरू आणि दिल्लीने सलग दुसऱ्या वर्षी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचबरोबर गेल्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला चेन्नईचा संघ या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. (IPL 2021: One place in points table, 3 contenders, playoffs Knot will be solved with this formula)
गुणतालिकेतील चौथ्या स्थानासाठी तीन संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. चेन्नई आणि दिल्लीचा संघ प्रत्येकी 18 गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बँगलोरने 16 गुणांसह तिसरं स्थान पटकावलं आहे. आता चौथ्या जागेसाठी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या तीन संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोलकाता संघ सध्या 13 सामन्यांपैकी 6 विजयांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकात्याचा एकच सामना बाकी आहे. तर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ 12 सामन्यांमधील 6 विजयांसह अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या क्रमांकावर आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या तीन संघांपैकी कोलकाताचा संघ शेवटचा सामना जिंकल्यावरच प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. या संघाचा प्लस पॉईंट म्हणजे त्याचा नेट रन रेट देखील खूप चांगला आहे. परंतु समस्या अशी आहे की, कोलकाताला राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळावा लागेल, जो संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहे आणि त्यासाठी राजस्थान सर्व शक्य प्रयत्न करत आहे.
प्लेऑफसाठीच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्स हा संघदेखील आहे. राजस्थानने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरच त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळेल. यामध्ये एक सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत आहे. मागील सामन्यात सीएसकेला पराभूत करून हा संघ रन रेटच्या बाबतीत मुंबई इंडियन्सपेक्षा सरस ठरला आहे. अशा परिस्थितीत, जर त्यांनी पुढील दोन सामने जिंकले, तर त्यांचे 14 गुण होतील आणि त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळेल.
मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आता त्यांच्या दमदार कामगिरीवर अवलंबून असेल. कारण रोहित शर्माच्या या टीमला आता फक्त जिंकणेच नाही तर त्यांचा नेट रन रेटही वाढवायचा आहे. संघाला पुढील दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने सोपे होणार नाहीत कारण सनरायझर्सकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि राजस्थान रॉयल्स स्वतः प्लेऑफच्या शर्यतीसाठी मोठा दावेदार आहे.
इतर बातम्या
IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट
(IPL 2021: One place in points table, 3 contenders, playoffs Knot will be solved with this formula)