मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स मध्ये (RR vs KKR) 30 वा सामना झाला. राजस्थानने या सामन्यात कोलकातावर सात धावांनी निसटता विजय मिळवला. या सामन्यात जोस बटलर आणि युजवेंद्र चहलच्या कामगिरीच भरपूर कौतुक झालं. दोघांनी राजस्थानसाठी निर्णायक कामगिरी केली. बटलरने (Jos buttler) 103 शतक झळकावलं, तर चहलने हॅट्ट्रिक घेत पाच विकेट काढल्या. या दोघांच्या प्रभावी खेळामुळेच राजस्थानला विजय मिळवता आला. कालचा सामना अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. शेवटच्या षटकापर्यंत ही लढत रंगतदार झाली. कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. त्याने 85 धावा केल्या. त्याआधी एरॉन फिंचने 25 चेंडूत 58 धावा तडकावल्या. सामन्याच्या अखेरीस उमेश यादवने सुद्धा चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे सामना रंगतदार झाला.
या सामन्यादरम्यान एरॉन फिंच आणि प्रसिद्ध कृष्णा दरम्यान मैदानावर झालेली शाब्दीक बाचबाची सुद्धा चर्चेचा विषय ठरली. राजस्थानने केकेआरला 218 धावांचे टार्गेट दिलं होतं. कोलकाताकडून श्रेयस अय्यर आणि एरॉन फिंचने तुफान फटेकबाजी केली. त्यामुळे नऊ षटकातच केकेआरने 100 धावा पूर्ण केल्या. ही जोडी राजस्थानच्या पराभवाला कारणीभूत ठरणार असं वाटतं होतं. त्यावेळी प्रसिद्ध कृष्णाने राजस्थानचा दुसरं यश मिळवून दिलं. त्याने फॉर्ममध्ये असलेल्या एरॉन फिंचला आऊट केलं. नवव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर त्याने फिंचला करुण नायरकरवी झेलबाद केलं.
बाद झाल्यानंतर एरॉन फिंच पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता. त्यावेळी प्रसिद्ध कृष्णा त्याला काहीतरी बोलला. त्यानंतर एरॉन फिंचनेही लगेच प्रसिद्ध कृष्णाच्या स्लेजिंगला उत्तर दिलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एरॉन फिंचने 28 चेंडूत 58 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते.
— Rishobpuant (@rishobpuant) April 18, 2022
राजस्थान रॉयल्सने पाच विकेट गमावून 217 धावा केल्या. जोस बटलरने 61 चेंडूत 103 धावा फटकावल्या. यात नऊ चौकार आणि पाच षटकार होते. त्याशिवाय संजू सॅमसनने 38 आणि शिमरॉन हेटमायरने नाबाद 26 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताच डाव 19.4 षटकात 210 धावात आटोपला. केकेआरकडून कॅप्टन श्रेयस अय्यरने सर्वाधिक 85 आणि एरॉन फिंचने 58 धावांच योगदान दिलं.