मुंबई: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) प्रत्येक गोष्ट वेगळी असते. त्यामुळे नेहमीच चर्चा होते. मुंबई इंडियन्सची मालकी देशातील एका श्रीमंत कुटुंबाकडे आहे. या श्रीमंत मालकाने मुंबई इंडियन्सचा संघासाठी तसा खास थाट ठेवला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघासाठी अख्खच्या अख्ख फाईव्ह स्टार हॉटेल बुक केलं आहे. मुंबई इंडियन्सचे मालक संघासाठी फक्त हॉटेल बुक करुनच थांबलेले नाहीत, तर त्यांनी रोहित शर्माच्या (Rohit sharma) टीमसाठी बायो सेक्युर रिक्रिएशनल फॅसिलिटी सुद्धा तयार केली आहे. 13 हजार चौरस मीटरमध्ये ही रिक्रिएशनल फॅसिलिटी (Recreational facility) उभारली आहे. या रिक्रिएशनल फॅसिलिटीमध्ये खेळाडूंसाठी आरामाच्या आणि मनोरंजनच्या सर्व सुविधा आहेत. मुंबई इंडियन्सने फारशी ओळख नसलेले कमी किंमतीतले खेळाडू निवडले. पण मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफ या खेळाडूंना घडवण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेच. पण त्याचवेळी हे सर्व खेळाडू आनंदी कसे रहातील, त्याची विशेष काळजी सुद्धा घेतली जातेय.
का उभारली रिक्रिएशनल फॅसिलिटी?
रिक्रिएशनल फॅसिलिटी हा त्याचाच एक भाग आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील जियो वर्ल्ड गार्डनमध्ये मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने बायो-सेक्युएर ‘एमआय ॲरेना’ उभारला आहे. 13 हजार चौरस मीटर भागात हा ॲरेना पसरलेला आहे. खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य या ॲरेनामध्ये येऊन स्वत:च मन प्रफुल्लित करु शकतात. संघ भावना बळकट करणं हा देखील या रिक्रिएशनल फॅसिलिटीचा उद्देश आहे. खेळाडू इथे येऊन रिलॅक्स होऊ शकतात. मुंबई इंडियन्स खेळाडूंना वन फॅमिली म्हणते, तेच त्यांनी आपल्या कृतीतून करुन दाखवलं आहे.
काय आहे या रिक्रिएशनल फॅसिलिटीमध्ये?
13 हजार चौरस मीटर परिसरात एमआय ॲरेना पसरलेला आहे. बॉक्स क्रिकेट, पिकल बॉल कोर्ट, फुट व्हॉली बॉलची सुविधा आहे. मिनी गोल्फची रेंजही इथे आहे. लहान मुलांसाठी किडस झोन आणि एमआय कॅफे सुद्धा इथे आहे. लाऊंज रुम आणि मसाज चेअर्स सुद्धा इथे आहे.
संगीत प्रेमींसाठी म्युझिक बँड, टेबल टेनिस, पूल टेबल अशा वेगवेगळ्या सुविधा इथे आहेत. खेळाडू एकमेकाशी जोडले गेले पाहिजेत. त्यांच्यात सांघिक भावना तयार झाली पाहिजे, या हेतूने ‘एमआय ॲरेना’ उभारण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सचा इतिहास काय सांगतो?
मुंबई इंडियन्सने नव्याने संघ उभारणी केली आहे. फारशी ओळख नसलेले अनेक नवखे चेहरे या संघामध्ये आहेत. मुंबई इंडियन्सचा आतापर्यंत इतिहास पाहता त्यांनी अनेक खेळाडूंना घडवलं आहे. मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफ या खेळाडूंवर मेहनत घेतो. प्रत्येक खेळाडूसाठी विशेष कार्यक्रम आखला जातो. आताची टीम नवीन असली, तरी निश्चित ते स्वत:ची वेगळी ओळख बनवतील.