मुंबई: यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा फॉर्म हरवला आहे. मुंबई इंडियन्सची टीम खूपच खराब कामगिरी करतेय. मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीगलमधला एक यशस्वी संघ आहे. चौदापैकी तब्बल पाच वेळा या टीमने आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे. पण सध्या मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरु आहे. मुंबईची टीम आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्याने मुंबईच्या पराभवाला सुरुवात झाली. त्यानंतर राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पराभवाचा चौकार या टीमने मारला. आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये नैराश्य पसरलं होतं. सर्व खेळाडूंचे चेहरे पडले होते. खिन्नतेचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक झहीर खानने आपल्या शब्दांनी टीममध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. टीमच मनोबल वाढवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.
“पराभव होतो तेव्हा दु:ख होणं स्वाभाविक आहे. तुम्ही मैदानात जाऊन सामना जिंकण्याचा जो रोमांच आहे, त्याचा आनंद घ्या. इथे चेहरेच सर्व काही सांगून जातायत. अजून यापेक्षा वाईट काय घडू शकतं? मोठा सीजन आहे. निकाल काहीही लागो, मैदानात जाऊन सर्वोत्तम खेळ करा” असं झहीर खान म्हणाला.
“हरलो तरी आपण एकत्रच रहाणार आहोत. खेळाचा आनंद घ्या. आपल्याकडे प्रतिभावान, अनुभवी खेळाडू आहेत. करीयरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मैदानावर जा, मोकळेपणाने व्यक्त व्हा, आज आपण कुठे आहोत आणि सीजन संपताना कुठे असणार आहोत, या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो, ते महत्त्वाचं आहे” असं झहीर खानने सांगितलं.
“आपण पुरेशा बैठका केल्या आहेत, संघाला काय हवं आहे?, कसली गरज आहे, ते आपल्याला ठाऊक आहे. मैदानावर जा, खेळाचा आनंद घ्या असं झहीर म्हणाला. दबावाखाली असताना सूर्याने चांगली कामगिरी केली. ज्यावेळी एक जण चांगला खेळतोय, तेव्हा इतरांनी त्याला सहकार्य करा. सर्वच जण एकादिवशी चांगले खेळू शकत नाहीत. जो चांगला खेळतोय, त्याला सपोर्ट करा. क्रिकेटचा आनंद घ्या. हसा, चिअर अप, गेट अप अँड डू इट” हे झहीरचे शब्द होते.