मुंबई: IPL 2022 चा सीजन चेन्नई सुपर किंग्सलाही लक्षात ठेवायला आवडणार नाही. CSK ने 14 सामन्यात फक्त 8 पॉइंट्स मिळवले. चेन्नईचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) सुद्धा या सीजनमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. एक-दोन इनिंग सोडल्यास, रायुडू अपयशी ठरला. सीजन संपण्याआधी रायुडूने निवृत्ती घोषणा केली. त्यानंतर लगेच 10 मिनिटात टि्वट डिलीट केलं. त्यावरुन एक नवीन वाद निर्माण झाला. रायुडू पुढच्या सीजनआधी निवृत्ती घेणार की, नाही ते नंतर समजेलच. रायुडू पुढच्या सीजनमध्ये एका नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. तुम्ही लगेच याचा आयपीएलशी संबंध जोडाल, पण तसं नाहीय. चेन्नई सुपर किंग्स किंवा आयपीएलचा हा विषय नाहीय. रायुडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला संघ बदलणार आहे.
36 वर्षांचा रायुडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला स्थानिक संघ बदलणार आहे. तो बडोदा क्रिकेट संघाकडून खेळू शकतो. रायुडू आणि बडोदा क्रिकेट संघटनेत याबद्दल चर्चा सुरु आहे. अंबाती रायुडू बडोद्याकडून क्रिकेट खेळण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी चार वर्ष तो बडोदा क्रिकेट संघाकडून खेळला आहे. रायुडू आणि बडोद्यामध्ये बोलणी यशस्वी झाली, तर पुढच्या सीजनमध्ये अंबाती रायुडू कृणाल पंड्यासोबत बडोदे संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. ‘द इंडियन एक्स्प्रेसने’ हे वृत्त दिलं आहे.
बडोदा क्रिकेट संघटनाही रायुडूला आपल्याकडून संधी देण्यासाठी इच्छुक आहे. दीपक हुड्डाने बडोद्याची साथ सोडल्यानंतर टीम एका अनुभवी फलंदाजाच्या शोधात आहे. रायुडूने स्वत: इच्छा व्यक्त केलीय. यासाठी चर्चा सुरु आहे. दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्यामध्ये मागच्यावर्षी वाद झाला. त्यानंतर हुड्डाने राजस्थाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
रायुडूने आपल्या दीर्घ फर्स्ट क्लास करीयरमध्ये गृहराज्य आंध्र प्रदेश शिवाय हैदराबाद, बडोद्याचेही प्रतिनिधीत्व केलं आहे. चार वर्षापूर्वीच त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त लिस्ट ए आणि टी 20 चे सामने रायुडू खेळतो.