मुंबई: मागच्या काही काळापासून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बॅडपॅचमध्ये आहे. अपेक्षित कामगिरी त्याच्याकडून होत नाहीय. त्यामुळे सातत्याने त्याच्यावर टीका होत आहे. मागच्या महिन्यात संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याने निराशाजनक प्रदर्शन केलं. अजिंक्य रहाणेचं भारतीय क्रिकेट संघातील करीयर संपलं अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने अजिंक्य रहाणेला रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आहे. नुकतचं बॅकस्टेज विथ बोरीया कार्यक्रमात बोलताना अजिंक्य रहाणेने “माझ करीयर संपलं, असं लोक जेव्हा म्हणतात, तेव्हा मी फक्त हसतो” असं म्हटलं होतं. रहाणेच्या मते “ज्यांना खेळ समजतो, ते असं बोलणार नाहीत” एकूणच अजिंक्य रहाणेसाठी सध्याचा काळ संघर्षाचा आहे. अजिंक्य रहाणेचा एकूणच सर्व परफॉर्मन्स बघून IPL Mega Auction 2022 मध्ये त्याच्यावर कुठला संघ बोली लावले? असा प्रश्न होता. पण कोलकाता नाइट रायडर्सने बोली लावून त्याला विकत घेतलं. अजिंक्यची बेस प्राइस 1 कोटी रुपये होती. KKR ने त्याला त्याच किंमतीला विकत घेतलं. कोलकाता व्यतिरिक्त अन्य दुसऱ्या कुठल्याही फ्रेंचायजीने त्याच्यामध्ये रस दाखवला नाही. खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्यला KKR ने का विकत घेतलं असेल? त्यामागे काय कारणं आहेत, जाणून घेऊया.
अजून तीन ते चार वर्षांच क्रिकेट बाकी
अजिंक्य रहाणे सुरुवातीपासून आयपीएलमध्ये खेळतोय. मुंबई इंडियन्समधून त्याने आयपीएल करीयरला सुरुवात केली. राजस्थान रॉयल्स, रायजिंग पुणे सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधीत्व त्याने केलं. कोलकाता नाइट रायडर्स त्याची पाचवी फ्रेंचायजी आहे. 151 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 3941 धावा केल्या आहेत. तो आता 33 वर्षांचा आहे. त्याच्यामध्ये अजून तीन ते चार वर्षांच क्रिकेट बाकी आहे. रहाणेला विकत घेताना केकेआरने हाच त्याचा अनुभव लक्षात घेतला असावा.
शुभमन गिल KKR कडे नाही, मग आता….
शुभमन गिल आता गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता केकेआरकडून सलामीला येऊ शकतो. आगामी सीजनमध्ये वेंकेटश अय्यर सोबत अजिंक्य रहाणेला सलामीला येऊ शकतो. सलामीवीरची भूमिका पार पाडणं, अजिंक्यसाठी अजिबात नवीन नाहीय. कारण आयपीएलमध्ये अनेकदा तो सलामीला आला आहे. गरज पडली, तर अजिंक्य रहाणे मधल्याफळीतही खेळू शकतो.
दबावाच्या प्रसंगातही अजिंक्य रहाणे शांत दिसतो
अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाचा अनुभव आहे. नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत अजिंक्यने भारतीय संघाला विजयी मार्ग दाखवला आहे. त्याचा शांत आणि संयमी स्वभाव जमेची बाजू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दबावाच्या प्रसंगातही अजिंक्य रहाणे शांत दिसतो. त्यांच्या नेतृत्वाचा हा एक मोठा गुण आहे. मागच्यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात त्याचे महत्त्वाचे योगदान होते. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आहे. श्रेयस अय्यरला केकेआरचे कर्णधार बनवले जाण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी अजिंक्य रहाणेच्या अनुभवाचा अय्यर आणि केकेआर दोघांनाही फायदा होऊ शकतो.
IPL 2022 Auction Three reasons why Ajinkya Rahane is a perfect fit for Kolkata Knight Riders