नवी दिल्ली: बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत मंडळ BCCI बरोबर थेट पंगा घेतला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज तस्किन अहमदला (Taskin Ahmed) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळण्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तस्किनला यंदाच्या सीजनमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळता येणार नाहीय. लखनौ संघाने मेगा ऑक्शनमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला करारबद्ध केले होते. पण वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याला कोपराची दुखापत झाली. दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्यामुळे मार्क वुडने आयपीएलमधून माघार घेतली. त्यावेळी लखनौ संघाने बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदशी संपर्क साधला. तस्किन अहमद आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. पण बांग्लादेश बोर्ड त्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यास तयार नाहीय.
थेट पंगा घेतला
“बांग्लादेशचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा दौरा संपल्यानंतर आम्हाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची आहे. त्यामुळे तस्किन अहमदने आयपीएलमध्ये खेळणं योग्य होणार नाही” असं बीसीबीचे क्रिकेट संचालन प्रमुख जलाल युनूस यांनी म्हटलं आहे. बीसीबीने ही भूमिका घेऊन एकप्रकारे थेट बीसीसीआयशी पंगा घेतला आहे.
बीसीबीने तस्किनला काय सांगितलं?
बांग्लादेशचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरीज खेळतोय. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल. 11 एप्रिलपर्यंत ही मालिका चालेल. आयपीएल 26 मार्चपासून सुरु होत आहे. “आम्ही तस्किन बरोबर चर्चा केली आहे. त्याने सगळी परिस्थिती समजून घेतलीय. आयपीएल खेळू शकणार नाही, हे त्याने फ्रेंचायजीला सांगितलं आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध रहाणार आहे. त्यानंतर मायदेशी परतणार आहे” असे यूनुस म्हणाले.
Who will be the speedster filling Woody’s shoes? ?#AbApniBaariHai #LucknowSuperGiants #TataIPL #IPL2022 #CricketNews pic.twitter.com/jsKOKTlaQk
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 22, 2022
अँड्रयू टायवरही लखनौ सुपर जायंट्सची नजर
रिपोर्ट्सनुसार लखनौ टीम अँड्रयू टायच्याही संपर्कात आहे. त्याला सुद्धा स्क्वाडमध्ये सहभागी केले जाऊ शकते. टाय टी 20 स्पेशलिस्ट आहे. आयपीएल 2018 मध्ये त्याने पर्पल कॅपही मिळवली होती. राजस्थान संघासाठी त्याने 24 विकेट घेतल्या होत्या. टायच्या नावावर 27 आयपीएल सामन्यांमध्ये 40 विकेट आहेत. त्याचा इकॉनमी रेटही 8.46 धावा प्रति षटक आहे. डेथ ओव्हर्समध्येही तो गोलंदाजी करतो. लखनौने टायला संघात स्थान दिलं, तर तो वाईट सौदा ठरणार नाही.