मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) चा सीजन सुरु होऊन एक आठवडा होत आला आहे. कुठल्याही अडचणीशिवाय स्पर्धा व्यवस्थित सुरु आहे. यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या दोन शहरांमध्ये लीग स्टेजचे सर्व सामने आयोजित करण्यात आले आहेत. एकूण चार स्टेडियमवर लीग स्टेजचे 70 सामने होणार आहेत. सध्या स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी आहे. आता प्रेक्षकांचा हा आवाज आणखी वाढणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील उत्साह आणि रंगत आणखी वाढेल. पुढच्या काही सामन्यांपासून प्रेक्षकांना जास्त संख्येने उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात आलीय. येत्या सहा एप्रिलपासून स्टेडियमवर 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी महाराष्ट्र सरकारने दोन एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर आता स्टेडियमवर प्रेक्षकांच्या 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बुकमायशो’ IPL तिकीट विक्रीची भागीदार आहे. त्यांनी ही माहिती दिली.
कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. याआधी सुद्धा परिस्थिती सुधारल्यामुळे 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. आयपीएलमधील लीग स्टेज म्हणजे साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात आणि प्लेऑफचे चार संघांमधील सामने गुजरातमध्ये आयोजित करण्यावर BCCI विचार करत आहे.
प्रवासामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यातुलनेत मुंबई-पुण्यात चांगल्या सोयी-सुविधा युक्त चार स्टेडियम उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळाडूंसह सर्वांचीच सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई-पुण्याचा पर्याय व्यवहार्य होता. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाला मुंबई-पुण्याला पहिली पसंती दिली.