मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आपला सराव सुरु केला आहे. स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. बीसीसीआयने तेच लक्षात घेऊन अत्यंत कठोर नियमावली तयार केली आहे. बायो बबल संदर्भात (IPL 2022 Bio- Bubble) हे नियम आहेत. BCCI ने कठोर नियम बनवलेत. बायो बबलचे नियम मोडल्यास त्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. संघाचे गुण कापण्यात येतील त्याशिवाय एक कोटी रुपयापर्यंत दंड ठोठावण्याची तरतूदही नियमात करण्यात आली आहे. बायो बबलमध्ये खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने मागचा सीजन स्थगित करावा लागला होता.
बायो बबलचे नियम मोडल्यास मोठी कारवाई
त्यानंतर स्पर्धेचं दुसरं सत्र यूएईमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. बीसीसीआयने आयपीएल संदर्भात आता कठोर नियम बनवले आहेत. कुठलाही खेळाडू, कुटुंबातील सदस्य, संघाचे मालक किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांनी बायो बबलचे उल्लंघन केल्यास त्याची किंमत संघांना चुकवावी लागेल. क्रिकबजने हे वृत्त दिलं आहे. बायो बबलचे उल्लंघन केल्यास खेळाडूवर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होईल. त्याशिवाय त्याला आणखी सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा मॅच अधिकाऱ्याने उल्लंघन केल्यास मोठी कारवाई केली जाईल.
टीमला ठोठवणार एक कोटीचा दंड, गुणही कापणार
आयपीएल 2022 दरम्यान जाणूनबुजून कुठल्याही व्यक्तीला टीमने बायो बबलमध्ये आणलं, तर शिक्षा म्हणून एक कोटी रुपयापर्यंत रक्कम भरावी लागेल. अशी चूक पुन्हा झाली, तर टीमचे एक ते दोन पॉईंट कापले जातील.
खेळाडूने बायो बबलचा नियम मोडला तर काय होईल?
पहिल्यांदा बायो बबल मोडल्यास खेळाडूला सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. त्याशिवाय तो जितके सामने खेळणार नाही, त्याचे पैसे सुद्धा त्याला मिळणार नाहीत. दुसरी चूक केल्यास खेळाडूला सात दिवसाच्या क्वारंटाइन बरोबर एक मॅचच्या बंदीचाही सामना करावा लागेल. तिसऱ्यांदा बायो बबलचे उल्लंघन केल्यास संपूर्ण मोसमासाठी बाहेर केलं जाईल व संघाला कुठली रिप्लेसमेंटही मिळणार नाही.
खेळाडूच्या कुटुंबाने बायो बबल तोडलं तर?
पहिली चूक केल्यास खेळाडूच्या कुटुंबातील सदस्याला सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. दुसरी चूक केल्यास खेळाडूचं कुटुंब, मित्रांना बायोबबल मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तसेच त्याच्याशी संबंधित खेळाडूला सात दिवस क्वारंटाइन मध्ये राहवं लागेल.
कुठल्या बाहेरच्या व्यक्तीला बायो बबलमध्ये प्रवेश दिला तर?
पहिली चूक केल्यास त्या संघाला दंड म्हणून एक कोटी रुपये भरावे लागतील. दुसरी चूक केल्यास एक गुण कापला जाईल आणि तिसरी चूक केल्यास दोन गुण कापले जातील.
संबंधित बातम्या:
IPL 2022: नरिमन पॉईंट ते अंधेरी, मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये IPLची कुठली टीम उतरणार, काय सुविधा मिळणार?
IPL 2022: आयपीएल खेळण्याआधी 10 षटक टाकून दाखवं, BCCI, NCA कडून हार्दिक पंड्याला चॅलेंज
IPL 2022: ‘या’ परदेशी खेळाडूंनी आयपीएल संघांना दिला धोका, वेळेवर खेळण्यासाठी उपलब्ध नसणार