मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) प्रत्येक सामन्याच्यावेळी अभिनेत्री प्रिती झिंटाची (Preity zinta) चर्चा होते. अगदी 2008 सालच्या पहिल्या सामन्यापासून पंजाब किंग्सच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी प्रिती झिंटा स्टेडियममध्ये आपल्या टीमचा उत्साह वाढवताना दिसली आहे. प्रिति झिंटा आता आई झाली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मातृत्वाची जबाबदारी असल्याने प्रीति झिंटा यंदाच्या सीजनमध्ये स्टेडियममध्ये दिसली नव्हती. पण कालच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धच्या सामन्याच्यावेळी वानखेडेवर प्रिती पंजाब किंग्ससाठी चिअर करताना दिसली. पंजाब किंग्सच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी प्रिती झिंटाचा उत्साह पाहण्यासारखा असतो. मैदानावर पंजाब किंग्सच्या खेळाडूंनी चौकार-षटकार मारल्यानंतर प्रितीचा उत्साह, जोश लक्षवेधी असतो. कालच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्याच्यावेळी देखील वेगळी स्थिती नव्हती.
काल शिखर धवनच्या हाफ सेंच्युरीपासून ते पंजाबच्या गोलंदाजांनी विकेट काढल्यानंतर प्रिती खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसली. काल पंजाब किंग्सने विजय मिळवल्यानंतर तिने PBKS च्या समर्थकांसोबत जोरदार सेलिब्रेशन केलं. प्रिती झिंटा एका यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री आहे. आता तिच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्याही आहेत. आयपीएल सामन्याच्यावेळी प्रिती झिंटा स्टेडियमवर उपस्थित राहते, त्यावेळी तिच्या लूकची, अदांची नेहमीच चर्चा होते. प्रितीने काल सफेद रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. स्टेडियममधल्या तिच्या उपस्थितीचे फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मागच्यावर्षी टीमला सपोर्ट करण्य़ासाठी प्रिती यूएईला सुद्धा गेली होती. प्रितीने नोव्हेंबर महिन्यात दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मातृत्वाच्या जबाबदारीमुळेच ती यंदाच्या मेगा ऑक्शनमध्येही दिसली नाही.
कालच्या मॅचमध्ये पंजाबने 11 धावांनी बाजी मारली. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 88 धावांच्या खेळीमुळे पंजाबचा विजयाचा मार्ग सुकर झाला. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि एमएस धोनीने विजयासाठी शर्थ केली. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. पंजाब किंग्सच्या 188 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते.