मुंबई: राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला नमवलं (RR vs DC) व यंदाच्या सीजनमध्ये पाचव्या विजयाची नोंद केली. हा सामना राजस्थानने जिंकला. पण शेवटच्या षटकात मात्र मैदानावर मोठा ड्रामा पहायला मिळाला. अंपायरच्या एका निर्णयावर ऋषभ पंत (Rishabh Pant) इतका नाराज झाला की, खेळाडूंना तो माघारी ड्रेसिंग रुममध्ये बोलवत होता. ऋषभने अंपायर बरोबरच राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर (Jos buttler) बरोबर सुद्धा वाद घातला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचला. शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. रोव्हमॅन पॉवेल स्ट्राइकवर होता. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचले. त्यामुळे दिल्लीच्या आशा जिवंत होत्या. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. पण त्यावरुन बराच वाद झाला.
दिल्ली कॅपिटल्सच्या मते चेंडू कमरेच्या वर होता. त्यामुळे पंचांनी हा नो-बॉल द्यावा, असं त्यांचं मत होतं. स्ट्राइक वर असलेल्या रोव्हमॅन पॉवेलने नो-बॉल का दिला नाही? म्हणून अंपायरकडे विचारणा केली. त्यावेळी पंत डग आउट एरियामध्ये बसला होता. तो आपल्या जागेवरुन उठला व सीमारेषेजवळ येऊन त्याने आपली नाराजी व्यक्त केली. अंपायर आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यावेळी ऋषभ पंत खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये माघारी बोलवलं. त्यानंतर ऋषभने सहाय्यक कोच प्रवीण आमरे यांना मैदानात जाऊन पंचांशी बोलायला सांगितलं.
आमरे लगेच मैदानात गेले. पण पंचांनी त्यांना माघारी पाठवलं. त्यानंतर भडकलेला पंत सर्वात शेवटी जाऊन बसला. या हंगाम्यानंतर दिल्लीला विजयासाठी तीन चेंडूत तीन षटकारांची गरज होती. पण पुढच्या दोन चेंडूंवर फक्त तीन धावा आल्या. शेवटच्या चेंडूवर रोव्हमॅन कॅचआऊट झाला. असाच वाद 2019 मध्ये बघायला मिळाला होता. पंचांच्या निर्णयावर नाराज धोनी डगआउट मधून उठून मैदानात गेला होता. त्याने एका निर्णयावरुन पंचाबरोबर वाद घातला होता.
1st ever declaration in T20 by Rishabh Pant ?
Pant on fire ??
But that is clearly no ball ?#Pant #Powell #RRvsDC #DCvRR #RishabhPant #IPL2022 pic.twitter.com/uTviM6jaAc— Nara Akhil Chowdhury (@prabhas_mania17) April 22, 2022
हा सर्व हंगामा सुरु असताना बाउंड्रीवर फिल्डिंग करणारा जोस बटलरही पंत बरोबर चर्चा करत होता. पंत त्याच्याबरोबरही बोलताना चिडलेला दिसत होता. सामना संपल्यानंतर ऋषभने अंपायर बरोबरही चर्चा केली. “तो नो बॉल आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असता. डगआउटमध्ये आम्ही सगळे निराश झालो होतो. तो नो बॉलच होता. थर्ड अंपायरने हस्तक्षेप करुन तो नो बॉल द्यायला पाहिजे होता. मी प्रवीण आमरेना पाठवण चुकीच होतं. पण आमच्याबरोबर जे झालं ते ही चुकीचच होतं” असं सामना संपल्यानंतर पंतने सांगितलं.