मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेला (IPL) आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र त्याआधी काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीने चांगलच हैराण केलं आहे. अनेक प्रमुख खेळाडूंनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. याचा परिणाम थेट टीमच्या प्लानिंगवर होत आहे. ऐनवेळी बाहेर पडणाऱ्या खेळाडूच्या तोडीचा दुसरा प्लेयर कसा आणायचा? हा सर्व फ्रेंचायजींसमोर मुख्य प्रश्न आहे. खासकरुन इंग्लंडच्या क्रिकेटपटूंमुळे आयपीएल फ्रेंचायजींना जास्त धक्का बसला आहे. जेसन रॉय (Jason Roy) नंतर शुक्रवारी अॅलेक्स हेल्सने माघार घेतली. तो कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळणार होता. जेसन रॉयला गुजरात टायन्सने विकत घेतलं होतं. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला जोफ्रा आर्चरसारखी कोपराची दुखापत झाली आहे.
हेल्स आणि रॉय प्रमाणे वुडही दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेऊ शकतो. त्याला लखनौ सुपर जायंट्सने तब्बल 7.5 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. मागच्यावर्षी सुद्धा अनेक इंग्लिश क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून माघार घेतली होती.
इमर्जन्सी, दुखापत आम्ही समजू शकतो
“जेव्हा एखादा खेळाडू उपलब्ध असतो. तेव्हा फ्रेंचायजी काही प्लान्स बनवतात. इमर्जन्सी असेल किंवा दुखापत आम्ही समजू शकतो. पण काही बाबतीत असं नाहीय. भविष्यात इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना विकत घेण्याआधी फ्रेंचायजी नक्कीच विचार करतील” असं फ्रेंचायजीने इनसाइस स्पोटर्सला सांगितलं.
फ्रेंचायजी नाराज
इंग्लिश खेळाडूंच्या माघारीमुळे मोठा अडथळा येत नाहीय. पण फ्रेंचायजी त्यांच्या वर्तनावर नाराज आहेत. रॉय आणि हेल्सने बायोबबलचं कारण दिलं आहे. हे खेळाडू आता जे कारण देऊन बाहेर होतायत, त्यावर फ्रेंचायजी आणि माजी खेळाडूंकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यांना नियम वैगेरे आधी माहित नव्हतं का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
पराभव माघारीचं मुख्य कारण
Ashes मालिकेतील पराभव हे सुद्धा इंग्लिश खेळाड़ूंच्या माघारीचे एक कारण आहे. मागच्या महिन्यात Ashes मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला होता. त्यावेळी मायदेशात इंग्लिश क्रिकेटपटूंवर बरीच टीका झाली होती. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी खराब कामगिरीसाठी आयपीएलला जबाबदार धरलं होतं.