मुंबई: मुंबई इंडियन्सला भले यंदाच्या IPL सीजनमध्ये कमाल करता आली नसेल, पण युवकांना संधी देण्याची परंपरा त्यांनी कायम राखली. आपल्या स्टार खेळाडूंशिवाय उतरलेल्या Mumbai Indians ला सुरुवातीचे सलग आठ सामने गमवावे लागले. मुंबईने या सीजनमध्ये तिलक वर्मा, कार्तिकेय सिंह आणि दिल्लीच्या ऋतिक शौकीनला संधी दिली. दिल्लीचा हा युवा स्टार खेळाडू लीग राउंड संपेपर्यंत मुंबईचा प्रमुख खेळाडू बनला. 21 वर्षाच्या ऋतिक शौकीनचा (Hrithik shokeen) दिल्लीत जन्म झाला असून तो ऑफस्पिन गोलंदाजी करतो. मुंबईने लीगच्या 33 व्या सामन्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्याला संधी दिली. त्या सामन्यात ऋतिक शौकीनने 25 धावा केल्या. किफायती गोलंदाजी केली. चार षटकात त्याने 23 धावा दिल्या.
ऋतिक शौकीनच्या यशामध्ये त्याच्या वडिलांचाही वाटा आहे. संघर्षाच्या दिवसात ते ऋतिक सोबत होतें. ऋतिक खूप चंचल होता. बालपणी शाळेत तो आपल्या जागेवर क्षणभरही बसायचा नाही. त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट अकादमीत दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्या एका निर्णयाने ऋतिकचं आयुष्य बदललं. ऋतिक क्रिकेटबद्दल खूपच गंभीर होता. तो विवाह किंवा कुठल्याही अन्य कार्यक्रमाला जाणं टाळायचा. सकाळी वडिलांबरोबर तो नेट प्रॅक्टिससाठी ग्राऊंडवर जायचा.
ऋतिक शौकीनचा मुंबई इंडियन्सपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याला अनेकदा एज ग्रुपच्या टीममध्ये निवडण्यात आलं. पण खेळण्याची संधी मिळाली नाही. क्लब क्रिकेटमध्ये 263 धावांची इनिंग खेळला. त्यानंतर अंडर 16 मध्ये त्याची निवड झाली. पण खेळण्याची संधी मिळाली नाही. अंडर 19 संघाचा भाग म्हणून त्याने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यावेळी संघाचे कोच असणारे राहुल द्रविड त्याच्या खेळाने प्रभावित झाले. त्यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी दिली. ऋतिकने लखनौमध्ये झालेल्या या सामन्यात आपल्या खेळाने अनेकांना प्रभावित केलं. पण दिल्ली क्रिकेट संघटनेने त्याला संधी दिली नाही. सैयद मुश्ताक आणि विजय हजारे ट्रॉफीच्या ट्रायल्समध्ये दमदार कामगिरी करुनही संधी दिली नाही. अखेर रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून संधी दिल्यानंतर त्याचं नशीब पालटलं