मुंबई: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) विजयाची प्रतिक्षा काल आठ सामन्यानंतर संपली. रोहित शर्माच्या बर्थ डे च्या दिवशी MI ने राजस्थान रॉयल्सला हरवलं व आपल्या कॅप्टनला सीजनमधल्या पहिल्या विजयाची भेट दिली. राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) टीम गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यासाठी मुंबई विरुद्ध विजय खूप महत्त्वाचा होता. पण असं होऊ शकलं नाही. कारण पॉइंटस टेबलमध्ये (Points Table) टीम्समधील गुणांचं अंतर खूप कमी आहे. प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे राजस्थानला कालच्या सामन्यात विजय आवश्यक होता. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठानने राजस्थान रॉयल्सच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इरफानच्या दृष्टीने संजू सॅमसनची चूक राजस्थानच्या पराभवाचं एक कारण आहे.
राजस्थान रॉयल्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य चार चेंडू बाकी असताना गाठले. टीमचा स्टार फलंदाज सूर्यकुमारने 51 आणि तिलक वर्माने 35 धावा केल्या. राजस्थानची गोलंदाजी या सामन्यात विशेष चालली नाही.
इरफान पठान नेहमीच स्पष्टपणे आपलं मत मांडण्यासाठी ओळखला जातो. राजस्थानच्या पराभवानंतर त्याने टि्वट केलं आहे. “डॅरिल मिचेलने सातवी ओव्हर टाकली, त्यामागचं मी लॉजिक समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ट्रेंट बोल्टने त्याचा चार षटकांचा कोटा पूर्ण केला नाही” असं इरफानने म्हटलय. संजू सॅमसनने सातवी ओव्हर डॅरेल मिचेलला दिली होती. या षटकात त्याने 20 धावा दिल्या.
त्याचवेळी ट्रेंट बोल्टने इशान किशनचा महत्त्वाचा विकेट मिळवून दिला. पण त्याला त्याच्या कोट्यातील चौथी ओव्हर दिली नाही. त्याने तीन षटकात 26 धावा दिल्या. इरफानने हे टि्वट करुन एकप्रकारे संजू सॅमसनच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह उपस्थि केलं आहे.
Still trying to understand the logic behind bowling Daryl Mitchell the 7th over. Trent Boult didn’t finish his quota of 4 overs.
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 30, 2022
सामना सुरु होण्याआधी दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिन्र शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा पहिला कॅप्टन आहे. त्याने या टीमला आयपीएलचे एकमेव विजेतेपद मिळवून दिलं होतं. काही महिन्यापूर्वी ह्दयविकाराच्या झटक्यामुळे थायलंडमध्ये त्याचं निधन झालं होतं.