नवी दिल्ली: इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 2022 च्या सीझनचं वेळापत्रक जवळपास अंतिम झालं आहे. आयपीएलच्या 15 व्या सीझनची सुरुवात 2 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावेळी स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार असून पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे. बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन भारतामध्येच केलं जाणार आहे.आयपीएलच्या 14 व्या सीझनची सुरुवात भारतामध्ये करण्यात आली होती. मात्र, कोरोना विषाणू रुग्णसंख्या वाढल्यानंतर ती स्थगित करावी लागली होती. 14 व्या सीझनचं उर्वरित सामने दुबईत आयोजित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली होती.
क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या 15 व्या सीझनची सुरुवात 2 एप्रिलला चेन्नईमधून होणार आहे. आयपीएलचा हा सीझन 60 दिवस सुरु राहील, अशी माहिती आहे. तर, आयपीएलची फायनल 4 किंवा 5 जूनला होणार आहे. या सीझनमध्ये प्रत्येक टीमला 14 मॅच खेळण्याची संधी असेल. त्यापैकी 7 मॅच होम ग्राऊंडवर तर उर्वरीत 7 मॅच दुसऱ्या टीमच्या ग्राऊंडवर होणार आहेत.
आयपीएलची पहिली मॅच चेन्नईमध्ये होण्याची शक्यता आहे. मॅच चेन्नईमध्ये असल्यानं पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्जची असणार आहे.चेन्नई विरुद्ध कोणती टीम असेल यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. मात्र, रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नईची पहिली मॅच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रोहित शर्माच्या मुंबईनं आतापर्यंत 5 वेळा आयपीएल जिंकलं आहे. तर, धोनीच्या सीएसकेनं 4 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.
आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये लखनऊ आणि अहमदाबादचे दोन संघ सहभागी होतील. त्यामुळं यंदा टीमची संख्या 10 वर पोहोचली आहे. 15 व्या हंगामात एकूण 74 मॅच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जनं 14 व्या हंगामाचं विजेतपद पटकावलं होतं.
इतर बातम्या:
कोच द्रविड खास डायरी नेहमी सोबत का ठेवतो? आवेश खानकडून राहुलच्या डायरीतले सिक्रेट्स शेअर
IPL 2022 is likely to commence from April 2 in Chennai