मुंबई: श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) काल मुंबई इंडियन्स विरुद्ध 52 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या (Playoff) आशा कायम असल्या, तरी त्यांचा मार्ग सोपा नाहीय. कालच्या विजयानंतर बोलताना श्रेयस अय्यर एक वाक्य बोलून गेला. त्यावरुन एक नवीन वाद निर्माण झाला आहे. केकेआर टीम मॅनेजमेंटच्या हस्तक्षेपामुळे संघाच्या प्रदर्शनाचा ग्राफ घसरतोय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. केकेआरने आतापर्यंत 12 सामन्यात 20 खेळाडूंना संधी दिली आहे. एकही असा सामना नाही की, जिथे मागच्या सामन्यातील प्लेइंग 11 जशीच्या तशी खेळली असेल. यामुळे केकेआरच्या संघात स्थैर्य येऊ शकलं नाही. मुंबई विरुद्धच्या सामन्यानंतर श्रेयस अय्यरला विचारलं गेलं की, संघात सतत होणाऱ्या बदलांवर खेळाडूंच काय मत असतं? त्यावर त्याने सूचक उत्तर दिलं. “हे सर्व कठीण आहे. अनेकदा कोच आणि सीईओ सुद्धा टीम निवडीमध्ये सहभागी होतात. प्रत्येक खेळाडू त्याच्याबाजूने सर्वोत्तम प्रयत्न करतोय”
दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन असताना, श्रेयस अय्यरच्या कॅप्टनशिपचं कौतुक झालं होतं. पण केकेआरच्या बाबतीत मात्र बिलकुल उलट होतय. संघ निवडीमध्ये खराब निर्णय हे केकेआरच्या पराभवामागचं एक कारण आहे. भारताचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी सुद्धा पॅट कमिन्सला बाहेर बसवण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. क्रिकेट विश्वातील नंबर एक वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला तुम्ही पाच सामने बाहेर कस बसवलं? असा प्रश्न उपस्थित केला.
केकेआरचे सीईओ वेंकी मैसूरने संघ निवडीतील हस्तक्षेपाच्या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिला. केकेआर मॅनेजमेंटच्या एक जवळच्या सूत्राने सांगितलं की, “श्रेयस अय्यरच्या विधानाला चुकीचा अर्थ निघेल, अशा पद्धतीने सादर करण्यात आलं” “श्रेयसच्या विधानाला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. ते संघ निवडीत हस्तक्षेप करतात, असं मला वाटत नाही. तो कोच आणि कॅप्टनचा अधिकार आहे. अनेकदा CEO चं मत मागितलं जातं. त्यावेळी त्यांनी काही सल्ले दिले असतील” असं केकेआरमधील सूत्राने सांगितलं. दुसऱ्या सूत्राने सांगितलं की, “केकेआरच्या कोचिंग स्टाफमध्ये ब्रँडन मॅक्कलम, डेविड हसी आणि अभिषेक नायर आहेत. अभिषेक नायर भले केकेआर एकेडमीशी संबंधित असतील, पण टीम मॅनेजमेंटमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे” सूत्रांनी जी माहिती दिली, त्यामुळे श्रेयस अय्यर खोटं बोलतोय का? असा प्रश्न निर्माण होतोय.