मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन बनवलं. याचं मुख्य कारण होतं त्याची फलंदाजी. मागच्या काही आयपीएल सीजन्समध्ये धावांच्या डोंगर उभा करणाऱ्या फलंदाजांमध्ये केएल राहुलचा समावेश होतो. आयपीएल 2022 च्या पहिल्या सीजनमध्ये राहुल विशेष काही करु शकला नव्हता. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर राहुलला पॅव्हेलियनमध्ये धाडलं होतं. केएल राहुलला पहिल्या सामन्यात खात सुद्धा उघडता आलं नव्हतं. दुसऱ्या सामन्यात 40 धावा करुन त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राहुलची अर्धशतकाची संधी हुकली. पण आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध केएल राहुलने ती कसर भरुन काढली. राहुलने आज कॅप्टन इनिंग्स खेळत शानदार अर्धशतक झळकावलं. संघाच्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या. राहुल ज्या कुठल्या संघाकडून खेळतो, त्या टीमच्या प्रमुख फलंदाजामध्ये त्याचा समावेश होतो.
राहुलला आज कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवावा लागणार होता. कारण लखनौच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीच टीमच्या तीन विकेट गेल्या होत्या. दुसरा सलामीवीर क्विंटन डि कॉकला वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. चौथ्या ओव्हरमध्ये सुंदरने इविन लुईसची मोठी विकेट काढली. लुईस बाद झाला त्यावेळी लखनौच्या दोन बाद 16 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मनीष पांडे सुद्धा तंबूत परतला. संघाची धावसंख्या तीन बाद 27 होती. केएल राहुल आणि दीपक हुड्डाने चौथ्या विकेटसाठी शानदार भागीदारी करुन टीमला संकटातून बाहेर काढलं. त्यांनी 87 धावांची भागीदारी केली. राहुलने 40 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलमधील हे त्याचं 28 वं अर्धशतक आहे.
Super Heroes have weapons,@rahulkl has his bat!
Captain has scored his half century in 40 balls#AbApniBaariHai #bhaukaalmachadenge#IPL2022 ? #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/OQYR8yJKEh— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 4, 2022
अर्धशतक पूर्ण होताच राहुलने आक्रमक फलंदाजी सुरु केली. वॉशिंग्टन सुंदरच्या 17 व्या षटकात त्याने पहिल्या दोन चेंडूंवर चौकार आणि त्यानंतर षटकार मारला. 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर जीवदानही मिळालं. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर अब्दुल समदने त्याचा झेल सोडला. टी.नटराजन टाकत असलेल्या 19 व्या षटकात केएल राहुल पायचीत झाला. राहुलने रिव्ह्यू घेतला. पण त्याचा फायदा झाला नाही. त्याने 50 चेंडूत 68 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता.