MI vs LSG IPL 2022: सेंच्युरी मारुनही KL Rahul ला 24 लाखांचा फटका, खेळाडूंना भरावे लागणार 6 लाख, जिंकूनही लखनौच्या गोटात निराशा

| Updated on: Apr 25, 2022 | 8:48 AM

MI vs LSG IPL 2022: मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवूनही लखनौ सुपर जायंट्सला समाधान लाभलं नाही. ते निराश झाले, कारण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने त्यांना शिक्षा ठोठावली.

MI vs LSG IPL 2022: सेंच्युरी मारुनही KL Rahul ला 24 लाखांचा फटका, खेळाडूंना भरावे लागणार 6 लाख, जिंकूनही लखनौच्या गोटात निराशा
MI vs LSG
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: IPL 2022 चा 15 वा हंगाम सुरु आहे. काल रात्री झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा (MI vs LSG) पराभव केला. मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही या स्पर्धेत आपलं खात उघडू शकलेला नाही. मुंबईचा या सीजनमधील सलग आठवा पराभव आहे. पाचवेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. लखनौच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ते कॅप्टन केएल राहुलने. राहुलने मुंबई इंडियन्स विरोधात 103 धावांची शतकी खेळी करुन एक चांगली धावसंख्या उभारुन दिली. राहुलच्या शतकाच्या बळावर लखनौने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 168 धावा केल्या. मुंबईला फक्त 132 धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवूनही लखनौ सुपर जायंट्सला समाधान लाभलं नाही. ते निराश झाले, कारण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने त्यांना शिक्षा ठोठावली.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने केली कारवाई

षटकांची गती धीमी राखल्याबद्दल आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने मोठा दंड ठोठावला आहे. आयपीएलकडून रविवारी रात्री उशिरा ही माहिती देण्यात आली. “24 एप्रिलला वानखेडे स्टेड़ियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल लखनौ सुपर जायंट्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे” असं आयपीएलकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

…तर राहुलवर एका सामन्याची बंदी

षटकांची गती धीमी राखल्याबद्दल लखनौ सुपर जायंट्सवर दंडात्मक कारवाई करण्याची या सीजनमधील दुसरी वेळ आहे. याआधी सुद्धा लखनौवर षटकांची गती धीमी राखल्याबद्दल दंडात्मक कारवाई झाली आहे. योगायोग म्हणजे मुंबई इंडियन्स विरुद्ध 16 एप्रिलला झालेल्या सामनच्यावेळीच लखनौला हा दंडा ठोठावला होता. त्या सामन्यातही केएल राहुलने शतकी खेळी साकारली होती. लखनौने पुन्हा ही चूक केली, तर कॅप्टनला एका सामन्याच्या बंदीची सुद्धा शिक्षा होऊ शकते.

दुसऱ्यांदा अचारसंहितेचे उल्लंघन

आयपीएलकडून स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. लखनौने या सीजनमध्ये दुसऱ्यांदा आयपीएल अचारसंहितेचे उल्लंघन केले. लखनौचा कॅप्टन केएल राहुलला 24 लाखाचा, तर टीम मधील अन्य खेळाडूंना 6 लाखाचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.