मुंबई: IPL 2022 स्पर्धेत प्लेऑफच चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही. इथे अजून चढ-उतार पहायला मिळू शकतात. लखनौ सुपर जायंट्ससाठी (LSG) स्थिती थोडी अनुकूल आहे. पण सनरायजर्स हैदराबादसाठी (SRH) प्लेऑफच चित्र फारस आशादायी नाहीय. ऑरेंज आर्मी म्हटल्या जाणाऱ्या एसआरएचला विजयाची आवश्यकता आहे. गुणतक्त्यात टॉपला रहायचं असेल, तर लखनौला सतत जिंकत रहाण आवश्यक आहे. पण दोन्ही टीम्सच्या विजयी मार्ग पाच खेळाडू खोडा घालू शकतात. महत्त्वाचं म्हणजे या पाचही खेळाडूंना खराब प्रदर्शनामुळे संघातून ड्रॉप करण्यात आलं होतं. पण पुनरागमन करताना ते जास्त धोकादायक दिसत आहेत.
तुम्ही म्हणाल दोन संघांसाठी पाच खेळाडू कसे धोकादायक बनू शकतात. कारण ते पाचही खेळाडू एकाच संघातील आहेत. 9 मे रोजी मुंबई इंडियन्सला पराभूत करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स संघातील हे खेळाडू आहेत. कोलकाताने मुंबई विरुद्ध खेळताना टीममध्ये पाच बदल केले होते. या पाचही जणांना खराब कामगिरीमुळे ड्रॉप करण्यात आलं होतं. काल केकेआरने मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी विजय मिळवला. यात या पाच खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वेंकटेश अय्यर: KKR ने या खेळाडूला रिटेन केलं होतं. तो ऑलराऊंडर आहे. बॅट आणि बॉल दोन्ही मध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याला ड्रॉप केलं. मुंबई विरुद्ध जेव्हा संधी मिळाली, तेव्हा वेंकटेश टॉप स्कोरर होता. त्याने 24 चेंडूत 43 धावा ठोकल्या.
पॅट कमिन्स: मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिल्या सामन्यात कमिन्सने बॅटने कमाल केली होती. पण नंतरच्या सामन्यात कमिन्सने भरपूर धावा दिल्या. म्हणून त्याला बाहेर बसवलं. कमिन्सला काल मुंबई इंडियन्स विरुद्ध संधी मिळाली, तेव्हा त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या.
अजिंक्य रहाणे: सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतर अजिंक्य रहाणेला बाहेर बसवण्यात आलं. मुंबई विरुद्ध काल त्याने 24 चेंडूत 25 धावा केल्या. पण वेंकटेश सोबत मिळूव पावरप्लेमध्ये त्याने अर्धशतकी भागीदारी रचली. IPL 2022 मध्ये केकेआरने पहिल्यांदा पावरप्लेमध्ये 50 धावा केल्या.
वरुण चक्रवर्ती – हा मिस्ट्री बॉलर सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये प्रभावहीन वाटला. केकेआरने याला सुद्धा रिटेन केलं होतं. काल संधी मिळाली, तेव्हा वरुणने ते विकेट काढले, जे मुंबईला विजय मिळवून देऊ शकत होते. त्याने टिम डेविडचा महत्त्वाचा विकेट काढला.
शेल्डन जॅक्सन: बॅटने कालच्या सामन्यात तो चमक दाखवू शकला नाही. पण विकेटकिपिंग करताना त्याने दोन कॅच घेतल्या. यात एक झेल रोहित शर्माचा होता.
तुम्ही विचार करत असाल, केकेआरचे हे पाच खेळाडू लखनौ आणि एसआरएच या दोन संघांसाठीच धोकादायक कसे ठरु शकतात. त्याचं असं आहे की, कोलकाताला आपले उर्वरित दोन सामने या दोन संघांविरुद्धच खेळायचे आहेत.