मुंबई: IPL 2022 स्पर्धेत रॉबिन उथाप्पाने (Robin uthappa) आज आक्रमक खेळ दाखवला. त्याने स्फोटक फलंदाजी केली. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या (LSG vs CSK) या अनुभवी फलंदाजाने आक्रमक शैलीत तुफान फटकेबाजी केली. रॉबिन उथाप्पाने 27 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्या फलंदाजीमुळेच चेन्नईने पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात एक बाद 73 धावा केल्या. यात 45 धावा एकट्या उथाप्पाच्या होत्या. रॉबिन उथाप्पाच्या बॅटमधून निघणारे फटके पाहून त्याला रोखणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. रॉबिन उथाप्पाने लखनौच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रॉबिनने चेन्नईच्या डावात पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार ठोकून आपले इरादे जाहीर केले. लखनौकडून आवेश खानने पहिले षटक टाकले. त्यानंतर अँड्रयू टाय, दुष्मंथा चमीरा या तिघांची रॉबिन उथाप्पाने धुलाई केली.
रवी बिश्नोईच्या चेंडूवर दोन धावा घेऊन 25 चेंडूत आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक झळकावलं. त्याच षटकात तो आऊटही झाला. बिश्नोईच्या एका अप्रतिम चेंडूवर तो पायचीत झाला. 50 धावांसह रॉबिन उथाप्पाने आयपीएलमध्ये 4800 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकलं. धोनीने 4796 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्यांच्या यादीत रॉबिन उथाप्पा आठव्या नंबरवर आहे. आयपीएल 2022 च्या ऑक्शनमध्ये रॉबिन उथाप्पाला सीएसकेने दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर विकत घेतलं होतं. मागच्या सीजनमध्ये शेवटच्या सामन्यांमध्ये उथाप्पाला संधी मिळाली होती. त्याने प्लेऑफ आणि फायनलमध्ये योगदान दिलं होतं.
5OBBIE ?#LSGvCSK #Yellove #WhistlePodu ?? pic.twitter.com/Eb0kKy7GHc
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 31, 2022
रॉबिन उथाप्पा 36 वर्षांचा आहे. मागच्या सीजनमध्ये त्याचं करीयर शेवटाकडे जात असल्याचं अनेकांना वाटलं होतं. उथाप्पा सीएसकेच्या आधी राजस्थान रॉयल्सचा भाग होता. उथाप्पा आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स, केकेआर, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या संघांकडून खेळला आहे.