मुंबई: यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ प्रचंड संघर्ष करतोय. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील एका यशस्वी संघाची खूप दयनीय अवस्था झाली आहे. सलग सात सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. आतापर्यंतच्या आयपीएल (IPL) इतिहासातील मुंबई इंडियन्सची ही सर्वात खराब कामगिरी आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरु आहे. मुंबईची टीम एक तरी सामना जिंकेल का? अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु आहे. आयपीएलची सर्वाधिक पाच विजेतेपद मिळवणारा, हाच तो संघ का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आज मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध सामना होणार आहे. लखनौच्या टीमने यंदाच्या सीजनमध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे. आज आयपीएलमधील 37 वा सामना या दोन टीम्समध्ये होणार आहे.
याआधी सुद्धा हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी लखनौने बाजी मारली होती. आजचा सामनाही जिंकून मुंबईला विजयपासून वंचित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. लखनौ सुपर जायंट्सने सात पैकी चार सामने जिंकले आहेत. पण मागच्या सामन्यात त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 18 धावांनी पराभव केला होता. मुंबई आणि लखनौमध्ये पहिला सामना झाला, त्यावेळी लखनौने 18 धावांनीच बाजी मारली होती. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव सातत्यपूर्ण कामगिरी करतायत. पण अन्य खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळत नाहीय. त्यामुळे मुंबईला सांघिक कामगिरीच्या बळावर अजून विजय मिळवता आलेला नाही. फलंदाजीपेक्षा मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची बाजू जास्त कमकुवत वाटते.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ख्रिस लिनने मुंबईच्या इंडियन्सच्या संघात मतभेद असल्याचा दावा केला होता. सीएसके विरुद्धच्या सामन्यात डॅनियल सॅम्सने चार विकेट घेतल्या होत्या. पण जयदेव उनाडकटला शेवटच्या षटकात 17 धावांचा बचाव करता आला नव्हता. धोनीने शेवच्या चेंडूवर चौकार मारुन चेन्नईला विजय मिळवून दिला होता. टायमल मिल्स, बासिल थम्पी आणि मुरुगन अश्विन यांचा संघर्ष सुरु आहे. रोहित शर्मा, इशान किशन फ्लॅाप आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मॅच विनर्सची उणीव प्रकर्षाने जाणवतेय.