बंगळुरु: IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर धनवर्षाव झाला. एकूण 204 खेळाडूंचा लिलाव झाला. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुत हा लिलाव पार पडला. त्यावेळी एक मोठी चूकही झाली. या चूकीमुळे खेळाडूची किंमत थेट 50 लाखाने वाढली. आयपीएल 2022 मेगा ऑक्शन दरम्यान ऑक्शनर चारु शर्मा (Charu Sharma) यांनी वॉशिंग्टन सुंदरवर (Washington Sundar) बोली लावाताना ही चूक केली. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. चारु शर्मा आयपीएल 2022 चे मूळ ऑक्शनर नव्हते. ह्यूज एडमीड्स यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे चारु शर्मा यांना ऑक्शनर म्हणून बोलवण्यात आले. चारु शर्मा पहिल्यांदा ऑक्शनर बनले होते. त्यावेळी त्यांच्याकडून चूकही झाली.
नेमकी काय चूक झाली?
वॉशिंग्टन सुंदरवर बोली पुकारत असताना चारु शर्मा यांच्याकडून ही चूक झाली. वॉशिंग्टन सुंदरवर बोली 6.50 कोटींपर्यंत पोहोचली, तेव्हा गुजरात टायटन्सने 6.75 कोटींची बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने सुंदरवर सात कोटी रुपयांची बोली लावली. याचवेळी चारु शर्मा चुकले. चारु शर्मा यांनी त्यानंतर 7.25 कोटीच्या बोलीचा पुकार करायला पाहिजे होता. पण त्यांनी थेट 7.75 कोटीचा पुकार केला. म्हणजेच वॉशिंग्टन सुंदरची किंमत थेट 50 लाखांनी वाढली. त्यावेळी चारु शर्मा यांच्याकडून झालेल्या या चुकीकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पण आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
वॉशिंग्टन सुंदरची 8.75 कोटीमध्ये विक्री
चारु शर्मा यांनी वॉशिंग्टन सुंदरवर 7.75 कोटी रुपयांची बोली पुकारतचा गुजरात टायटन्सने माघार घेतली. त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स मैदानात उतरले. अखेर सनरायजर्स हैदराबादने सुंदरवरची बोली जिंकली. वॉशिंग्टन सुंदरला 8.75 कोटी रुपये मिळाले.
Charu Sharma creates big mess.For Washi Sundar, the bid was with @DelhiCapitals for 700L. The next increament should be 725L but Charu Sharma called it, “next is 775L, the bid with DC for 750L” and the bid continued from 750L.Huge controversy cooking#IPL2022MegaAuction #IPL2022 pic.twitter.com/M5NHyVj8NT
— Rohit Rohon (@rohitrohon) February 12, 2022
खलील अहमदच्या ऑक्शनमध्ये मोठी चूक
चारु शर्मा यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या लिलावातही त्यांनी चूक केली. खलील अहमदवर मुंबई इंडियन्सने 5.25 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण त्यांनी खलील अहमदला दिल्ली कॅपिटल्सला विकलं.
ipl 2022 mega auction charu sharma make big mistake on washington sundar price increase controversy video