पुणे: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (MI vs KKR) सामना होणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर आजचा सामना होत आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा युवा फलंदाज इशान किशनवर (Ishan Kishan) सगळ्यांच लक्ष असेल. त्याने पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकं झळकावली असून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण कोलकात्याविरुद्ध खेळताना इशान किशनला विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध खेळताना इशान किशनचा रेकॉर्ड फार चांगला नाहीय. उमेश यादव. टिम साउदी, पॅट कमिन्स आणि सुनील नरेन या गोलंदाजांसमोर इशानच्या धावा होत नाहीत. आतापर्यंत तो स्वस्तात बाद झाला आहे. यंदाच्या सीजनची मुंबई इंडियन्ससाठी खूप खराब सुरुवात झालीय. दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) आणि राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. केकेआर विरुद्ध इशान किशनने जुन्या रेकॉर्ड़ची पुनरावृत्ती करु नये, एवढीच टीमची इच्छा असेल. डावखुऱ्या इशानने पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे खेळ दाखवावा, असंच टीम मॅनेजमेंटला वाटत असेल.
सध्या केकेआरसाठी उमेश यादव चांगली कामगिरी करतोय. इशान किशन आणि उमेश यादव एकदा आमने-सामने आले होते. त्यावेळी उमेशच्या पहिल्याच चेंडूवर इशान आऊट झाला होता. टिम साउदी समोरही इशानचा रेकॉर्ड फार चांगला नाहीय. साउदीचा सुद्धा एक चेंडू खेळून इशान आऊट झालाय. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यासाठी पॅट कमिन्सला निवडण्याचा केकेआरकडे पर्याय उपलब्ध आहे. त्याच्यासमोरही इशानचा फॉर्म फार चांगला नाहीय. ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे पाच चेंडू खेळून इशान दोनवेळा आऊट झाला आहे.
केकेआर विरुद्धच्या सामन्यासाठी आकडे इशान किशनला साथ देत नाहीयत, हे खरं आहे. पण यंदाच्या सीजनमध्ये दोन सामन्यात त्याने ज्या पद्धतीचे प्रदर्शन केलय, त्यामुळे इशानचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असणार. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध इशानने नाबाद 81 आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध 54 धावांची इनिंग खेळली आहे. दिल्ली विरुद्ध 48 चेंडूत 81 धावा फटकावताना 11 चौकार आणि दोन षटकार लगावले. रॉयल्स विरुद्ध पाच चौकार आणि एक षटकार लगावला. इशान किशन मुंबई इंडियन्सच्या महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. मुंबईने मेगा ऑक्शनमध्ये 15.25 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं आहे.