मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबईचा सामना होतोय. मागच्या सीजनपर्यंत मुंबई संघाचा भाग असलेला राहुल चाहर (Rahul chahar) आज आपल्या जुन्या सहकाऱ्यांना फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. मुंबईच्या खेळाडूंविरोधात आपण रणनिती तयार केलीय, असं राहुलने सांगितलं. मुंबई विराधोत खान प्लानसह मैदानात उतरणार असल्याचं राहुलने सांगितलं. राहुलने मुंबईच्या संघाकडून खेळताना आयपीएलचं जेतेपदही पटकावलं आहे. यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केलं नाही. पंजाब किंग्सने राहुल चाहरला विकत घेतलं. राहुल चाहर या सीजनमध्ये चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत चार सामन्यात त्याने सात विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सातव्या नंबरवर आहे. पंजाबच्या गोलंदाजी युनिटचा तो महत्त्वाचा भाग आहे.
मुंबईकडून सूर्यकुमार यादवची बॅट तळपत आहे. पहिल्या दोन सामन्यात दुखापतीमुळे सूर्यकुमार खेळू शकला नव्हता. पण नंतरच्या दोन मॅचमध्ये त्याने अर्धशतक झळकावली आहेत. “मी नेहमीप्रमाणे आजही 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीन. मुंबईच्या संघातील दोन-तीन फलंदाजांना गोलंदाजी करणं आव्हानात्मक आहे. माझी त्यांच्यावर नजर आहे. उदहारण म्हणून सूर्यकुमार यादव शानदार फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्मा सुद्धा चांगला फलंदाज आहे. त्यांना गोलंदाजी करण्यासाठी मी तयारी करत आहे. त्यांना बॉलिंग करण्यासाठी मी सज्ज सुद्धा आहे. मी त्यांच्यासाठी खास प्लान बनवतोय. पाहूया काय होतं ते”, असं क्रिकएडिक्टरने राहुलच्या हवाल्याने म्हटलं आहे.
व्यावसायिक खेळाडू असल्याने संघासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याचा माझा प्रयत्न असेल. मग भले समोर माझा भाऊ असूं दे. “लहानपणी मी माझ्या भावाविरोधात खेळलो आहे. त्यामुळे मला फरक पडत नाही. समोर कोण आहे त्याने. संघाला विजय मिळवून देणं माझं काम आहे. विजयासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व मी करीन” असं राहुल चाहर म्हणाला.