मुंबई: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रत्येक संघाला विशेष रणनिती आखून खेळावं लागणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सने 210 धावांचा डोंगर उभा केला होता. आजच्या सामन्यातही तेच चित्र दिसलं. राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली. सगळ्या फलंदाजांमध्ये उजवा ठरला तो जोस बटलर. सलामीला आलेल्या जोस बटलरने (Jos buttler) मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली. चौफेर फटेकबाजी करत जोस बटलरने या मोसमातील पहिलं शतक झळकावलं. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर सामना सुरु आहे. सुरुवातीच्या षटकांपासूनच जोस बटलरने मुंबईच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. खासकरुन बासिल थम्पीची गोलंदाजी फोडून काढली.
पहिलचं षटक टाकणाऱ्या थम्पीच्या ओव्हरमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार ठोकून त्याने 26 धावा वसूल केल्या. त्याने थम्पीच्या गोलंदाजीची दिशा आणि टप्पा बिघडवून टाकला. थम्पीच्या ओव्हरमधील तीन चेंडूंना त्याने प्रेक्षक गॅलरीत पोहोचवले. बटलरने अवघ्या 66 चेंडूत शतक पूर्ण केलं. यात 11 चौकार आणि पाच षटकार होते. आयपीएल करीयरमधील बटलरचं हे दुसरं शतक आहे.
Buttler smashed, Hetty hit – 194 to defend. Let’s do this. ?#RoyalsFamily | #HallaBol | #MIvRR pic.twitter.com/BeTUlRLhau
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 2, 2022
मागच्या सीजनमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध त्याने पहिलं शतक ठोकलं होतं. बटलरने कॅप्टन संजू सॅमसनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 50 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन आज 30 धावांवर आऊट झाला. पोलार्डच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तिलक वर्माकडे त्याने सोपा झेल दिला.