मुंबई: होळीचा (Holi 2022) दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी. आज संपूर्ण देशात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. लोक आपलं कुटुंब, मित्र परिवारासोबत रंगपंचमीचा आनंद लुटत आहेत. आपले लाडके क्रिकेटपटूही मागे नाहीत. सध्या देशातील सर्वच क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai indians) टीमसोबत असून त्याने सर्व चाहत्यांना आणि देशातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीच्या शुभेच्छा देणारा हा व्हिडिओ बनवताना रोहित शर्माला चांगलीच मेहनत करावी लागली. रोहित शर्माचा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात रोहित शर्मा होळीच्या शुभेच्छा देताना रिटेकवर, रिटेक घेताना दिसतोय. रोहितला त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. पण तो गोंधळलेला दिसतोय. रोहितने शुभेच्छा संदेशाचा हा व्हिडिओ देण्यासाठी अनेक टेक घेतले.
होळीचा सण आपण रंग लावून साजरा करतो, पण…
मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ पोस्ट करताना ‘या कुठल्या रांगेत आलात तुम्ही कॅप्टन साहेब?’ असं कॅप्शन दिलं आहे. 53261 टेक नंतर रोहितने सर्वांना हॅप्पी होली म्हटलं आहे. या व्हिडिओ रोहित सोबत त्याची पत्नी रितिका सजदेह सुद्धा दिसते. कुठला टेक चांगला वाटतो, असं रोहित तिला विचारतो. एक गमंत म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. फॅन्स मात्र या व्हिडिओचा आनंद घेतान भरपूर कमेंट करत आहेत. होळीचा सण आपण रंग लावून साजरा करतो. पण रोहितने या व्हिडिओत शेजारी पत्नी असूनही तिला रंग लावला नाही.
टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी दिल्या होळीच्या शुभेच्छा
रवींद्र जाडेजाने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळी हा प्रेम आणि आनंदाचा सण असून आपलं कुटुंब आणि मित्र परिवारासोबत साजरा करा. दिग्गज फलंदाज विराट कोहलीने सुद्धा होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रिकेटची होळी म्हणजे IPL 2022
क्रिकेट चाहत्यांसाठी होळीचा खरा सण 26 मार्चला सुरु होईल. जेव्हा आयपीएल 2022 स्पर्धेला सुरुवात होईल. मुंबईत चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्याने आयपीएलच्या 15 व्या सीजनला सुरुवात होणार आहे. यावेळी लीगमध्ये 10 संघ असून सर्वच टीम्स नव्या रुपात समोर येतील. आयपीएलचा रोमांच अनुभवण्यासाठी सर्वच चाहते उत्सुक आहेत. यंदा ही स्पर्धा भारतात होत आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकही टीमचा उत्साह वाढवण्यासाठी हजर असतील.