मुंबई: मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) काही भरवशाचे खेळाडू आहेत. कायरन पोलार्ड (kieron pollard) हे त्यापैकीच एक नाव. पोलार्ड म्हणजे मुंबईचा एक हुकूमी एक्का. म्हणून पोलार्डला मुंबई इंडियन्सने तब्बल सहा कोटी रुपये देऊन रिटेन केलं. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात मुंबई इंडियन्स एक यशस्वी संघ आहे. या टीमने आतापर्यंत पाच जेतेपद पटकावली आहेत. एमएस धोनीमुळे मुंबईपेक्षा चेन्नई सुपर किंग्सची जास्त चर्चा होते. पण विजेतेपदाच्या बाबतीत मुंबई चेन्नईच्या एक पाऊल पुढे आहे. मुंबई इंडियन्सने हे जे यश मिळवलय, त्यात पोलार्डचाही मोलाचा वाटा आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या तिन्ही विभागात कायरन पोलार्डने नेहमीच सरस कामगिरी केली आहे. संघाला गरज असताना धावा करणं, विकेट मिळवून देणं, यात पोलार्ड नेहमीच उपयुक्त कामगिरी करतो. त्याशिवाय जबरदस्त फिल्डिंगमुळे तो मुंबई इंडियन्सची ताकत आणखी वाढवतो.
कधीपासून मुंबई इंडियन्ससाठी खेळतोय?
कुठल्याही संघाला हवा असणारा हा खेळाडू आहे. 2010 पासून कायरन पोलार्ड फक्त मुंबई इंडियन्ससाठी खेळतोय. इतकी वर्ष एकाच संघाकडून खेळत असल्यामुळे मुंबई संघाबरोबर त्याचं एक वेगळं नात तयार झालं आहे. पण टीमच नाही, तर मुंबईच्या इंडियन्सच्या सर्वसामान्य चाहत्यांनाही तो आपला वाटतो. हेच पोलार्डच यश आहे. सध्या वेस्ट इंडिज संघाच कर्णधारपद भूषवणारा पोलार्ड पाच दिवसांपूर्वी मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. त्याने नेट्समध्ये सराव सुरु केला आहे. कायरन पोलार्डच्या नेटमधील सरावाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
बॅटिंग बघूनच तोंडातून जबरदस्त शब्द बाहेर पडतात
यामध्ये पोलार्डच्या बॅटमधून निघणारे कडक फटके पाहिले की, जबरदस्त अशीच प्रतिक्रिया निघते. पोलार्डची नेटमधील फलंदाजी पाहिली की, आगामी सीजन तो गाजवणार असा विश्वास वाटतो. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या पोलार्डच्या या व्हिडिओवर तात्यांचा सराव सुरू, चेन्नई कोमात, तात्या ऑन फायर अशाच कमेंट अनेकांनी केल्या आहेत.
मुंबई कडून किती सामने खेळला? किती धावा केल्या?
पोलार्ड 2010 सालापासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. आयपीएलमध्ये आतापर्यंत तो 178 सामने खेळला आहे. 3268 धावा करताना त्याने 65 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजपेक्षा पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी जास्त यशस्वी कामगिरी केली आहे. पोलार्डमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. मुंबई इंडियन्सने नव्याने संघाची बांधणी केली असून त्यात पोलार्डची भूमिका महत्त्वाची रहाणार आहे.