मुंबई: IPL 2022 स्पर्धेत दमदार प्रदर्शन करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला काल गुजरात टायटन्सकडून (LSG vs GT) पराभव स्वीकारावा लागला. गुजरातने विजयासाठी 145 धावांचं टार्गेट दिलं होतं. टी-20 क्रिकेटचा विचार करता, हे सोपं लक्ष्य होतं. पण लखनौचा डाव अवघ्या 82 धावात आटोपला. लखनौचा संघ पूर्ण 14 षटकही खेळू शकला नाही. क्विंटन डि कॉक, केएल राहुल (KL Rahul) फेल गेले. त्यानंतर लखनौच्या संघाने गुजरातच्या गोलंदाजांसमोर जणू शरणागतीच पत्करली. हा पराभव लखनौ सुपर जायंट्सच्या खूपच जिव्हारी लागला. खासकरुन लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीर खूपच नाराज दिसला. मॅच नंतर गौतम गंभीरने लखौन सुपर जायंट्सच्या खेळाडूंची शाळा घेतली. गौतम गंभीरने संपूर्ण टीम सोबत ड्रेसिंग रुमध्ये चर्चा केली. त्यांना फैलावर घेतलं. टीम कुठे चुकली, ते त्याने सांगतिलं. सामना हरण्यात काही चुकीच नाहीय. पण पराभव आधीच स्वीकारणं चुकीचं आहे. लखनौ सुपर जायंट्सने गौतम गंभीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय.
“सामन्यामध्ये जय-पराजय होत असतो. एक टीम जिंकणार, दुसरी हरणार. पण पराभव स्वीकारणं, पूर्णपणे चुकीच आहे. मला वाटतं, आपण आधीच पराभव स्वीकारला होता. आय़पीएल सारख्या स्पर्धेत दुबळेपणाला स्थान नाहीय” असं गौतम गंभीर या व्हिडिओमध्ये म्हणाला. “आपण या स्पर्धेत अनेक संघांना हरवलं आहे. आपण चांगलं क्रिकेट खेळलोय. पण आज आपण खेळाची समज हरवली. खेळाची समज सर्वात जास्त आवश्यक आहे. गुजरातने चांगली गोलंदाजी केली. आपण वर्ल्ड़ क्लास क्रिकेटर्ससोबत खेळत आहोत. त्यासाठीच आपण रोज प्रॅक्टिस करतो” अशा शब्दात गंभीरने आपल्या खेळाडूंना झापलं.
पॉइंटस टेबलमध्ये लखनौचा संघ गुजरात खालोखाल दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे 16 पॉइंटस आहेत. कालच्या सामन्याआधी दोन्ही संघांचे समान पॉइंटस होते. पण नेट रनरेटच्या आधारावर लखनौची टीम पहिल्या स्थानावर होती. कालच्या विजयामुळे गुजरात टायटन्स 18 पॉइंटससह पहिल्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये दाखल होणार गुजरात पहिला संघ ठरला आहे.