मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सीजन संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय सीजनला सुरुवात होईल. सर्वप्रथम भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच T-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल. टी 20 मालिकेचे नेतृत्व केएल राहुलकडे तर कसोटीचे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आहे. या दोन्ही मालिकांसाठी काल बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली. या दोन्ही सीरीजसाठी वेगवेगळे संघ निवडण्यात आले आहेत. काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. काही नव्या खेळाडूंना संधी दिली आहे, तर काही खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलय. दुर्लक्ष करण्यात आलेल्या खेळाडूंपैकीच एक आहे पृथ्वी शॉ. (Prithvi Shaw)
पृथ्वीला कसोटी किंवा टी 20 कुठल्याही संघात स्थान मिळालेलं नाही. पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. सध्या चालू असलेल्या आयपीएलमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलय. पण तरीही त्याला संधी मिळालेली नाही. अनेकांना पृथ्वी शॉ ची निवड न झाल्याचं आश्चर्य आहे.
IPL 2022 बद्दल बोलायचं झाल्यास, पृथ्वी शॉ ने 10 सामन्यात 283 धावा केल्यात. त्याची फलंदाजीची सरासरी 30 आहे. आयपीएलच्या लीग स्टेजमधल्या शेवटच्या काही सामन्यांआधी त्याला टायफाइडची बाधा झाली. त्यामुळे त्याला खेळता आलं नाही.
पृथ्वी शॉ 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉ संघाबाहेरच आहे. त्याच्याजागी शुभमन गिलला संधी मिळाली होती. त्याने चमकदार कामगिरी केली होती.
वनडे आणि टी 20 बद्दल बोलायचं झाल्यास, पृथ्वी शॉ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा सिनियर संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळत होता.
पृथ्वी शॉ चं आंतरराष्ट्रीय करीयर
5 कसोटी, 339 धावा, 42.37 सरासरी
6 वनडे, 189 धावा, 31.50 सरासरी
1 टी 20 – शुन्य धावा