मुंबई: IPL 2022 मध्ये Mumbai Indians संघ फ्लॉप ठरला, त्याचं एक प्रमुख कारण आहे रोहित शर्मा. रोहित शर्मा (Rohit sharma) या सीजनमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. रोहित शर्मा फलंदाजी करताना टायमिंग आणि मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. IPL 2022 मध्ये रोहितच्या फलंदाजीतून या दोन्ही गोष्टी गायब दिसल्या. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाचा रोहित शर्मा एकही अर्धशतक झळकवू शकला नाही. लीगमधील मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित शर्माला त्याच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने ‘अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या मला अनुकूल घडल्या नाहीत’ असं सांगितलं. रोहितची फलंदाजी इतकी खराब झाली की, त्याला 20 च्या सरासरीनेही धावा करता आल्या नाहीत. रोहित शर्मा या सीजनमध्ये 14 सामने खेळला. त्याने 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या.
“मी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण मनासारखं घडलं नाही. हे माझ्या बरोबर पहिल्यांदा झालेलं नाही. हे या आधी सुद्धा घडलय. क्रिकेट इथेच संपत नाही. अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. मला मानसिक दृष्ट्या मजबूत राहून, पुन्हा फॉर्म परत कसा मिळवता येईल, ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला जो काही वेळ मिळालाय, मी त्यावरच मेहनत घेणार आहे. मला माझ्या फलंदाजीतील काही त्रुटींवर काम करायचं आहे” असं रोहितने उत्तर दिलं.
रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी- 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यासाठी पुढच्या महिन्यात रवाना होईल. इंग्लंडमध्ये भारतीय संघ एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरु झाली होती. भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. मँचेस्टरमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार होता. पण भारतीय सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाची लागण झाल्याने ही कसोटी स्थगित करण्यात आली. आता 1 जुलैला हा कसोटी सामना होईल. भारताने हा कसोटी सामना जिंकला किंवा ड्रॉ केला, तर 15 वर्षानंतर भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय मिळेल.