मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट बरोबर ग्लॅमर आहे, तसंच इथे वादाचाही तडका पहायला मिळतो. आयपीएलमध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RR vs RCB) झालेल्या सामन्याच्यावेळी हे सर्व पहायला मिळालं. काल RCB चा प्रमुख गोलंदाज हर्षल पटेल आणि राजस्थानचा युवा फलंदाज रियान परागमध्ये (Riyan parag) मैदानातच जोरदार वादावादी झाली. हर्षल पटेल (Harshal patel) रियान परागच्या अंगावरही धावून गेला होता. पण राजस्थानच्या एका खेळाडूने मध्येपडून हर्षल पटेलला रोखलं. खरंतर हे भांडण इथेच संपायला पाहिजे होते. पण मॅच संपल्यानंतरही पुढचा अंक पहायला मिळाला. हर्षल पटेलच्या एका कृतीने फॅन्सही हैराण झाले, अनेकांना हर्षलचं हे वागणं पटलं नाही. राजस्थान रॉयल्सने काल आपल्या आठव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 29 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने फक्त 144 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा डाव 115 धावात आटोपला. रियान पराग हा राजस्थानच्या विजयाच्या नायक होता. त्याच्या 56 धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे राजस्थानला हा विजय मिळवता आला.
हर्षल पटेल शेवटच षटक टाकत होता. रियान पराग स्ट्राइकवर होता. या ओव्हरमध्ये रियानने 18 धावा फटकावल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होते. परागने याच ओव्हरमध्ये हाफ सेंच्युरी सुद्धा झळकावली. आपली इनिंग संपवून रियान पराग डगआउटकडे चालला होता. त्यावेळी हर्षल पटेल काहीतरी बोलला म्हणून तो मागे फिरला. दोघांची शाब्दीक बाचबाची सुरु होती. तितक्यात हर्षल पटेल धावून रियानच्या अंगावर गेला. पण राजस्थान एका खेळाडूने मध्यस्थी करत हर्षलला थांबवलं व वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
Cmon Harshal.. #Riyan is young & Impulsive..
Shake his hand say.. Well played kid.. ?No hard feelings mate#IPL2022 #Riyan #RRVSRCB pic.twitter.com/biZgPQe5Ga
— Straight Drive Podcast (@StraightDrive_) April 26, 2022
हा सर्व वाद इथेच संपला नाही. आरसीबीच्या डावात बाद होणारा शेवटचा खेळाडू होता हर्षल पटेल. कुलदीप सेन राजस्थानकडून शेवटचं षटक टाकत होता. कुलदीप सेनच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने मोठा फटका खेळला. रियान परागने हा झेल घेतला. नेहमीप्रमाणे परागने आपल्या स्टाइलमध्ये विकेट आणि विजयाचं सेलिब्रेशन केलं. पण हर्षल पटेलला ते आवडलं नाही. मॅच संपल्यानंतर सर्वच खेळाडू परस्परांशी हस्तांदोलन करत होते. त्यावेळी पटेल परागच्या बाजूने निघून गेला. रियान परागने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. पण हर्षल पटेल हात न मिळवताच पुढे निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.