मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) सुरु झाल्यापासून चेन्नईची खराब स्थिती आहे. पहिल्या दोन सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. दोन्ही सामन्यात चेन्नईचे (CSK) सलामीवीर फ्लॉप ठरले आहेत. तिसऱ्या सामन्यातही सलामीची जोडी कमाल दाखवेल, याची शक्यता कमी आहे. सलामीची जोडी प्रभाव पाडणार नाही, हे लिहिताना आकडेच तसे संकेत देत आहेत. ज्या सामन्यात ऋतुराज गायकवाडची (Rututaj Gaikwad) बॅट तळपणार, त्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स धावांचा मोठा डोंगर उभा करेल. पण सध्या वास्तव हे आहे की, ऋतुराजच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत. त्यामुळेच 15 व्या सीजमध्ये चेन्नई सुपर किंग्सला अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. आयपीएलच्या प्रत्येक सीजन बरोबर ऋतुराज गायकवाडची एक वेगळी गोष्ट आहे.
ऋतुराजने जेव्हापासून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला धावांचा दुष्काळ संपवता आलेला नाही. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातही हाच सिलसिला कायम राहिला, तर CSK ची पुन्हा एकदा खराब सुरुवात होईल. चेन्नई सुपर किंग्स आपला तिसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात फॉर्म मिळवणं, ऋतुराजसाठी थोडं कठीण आहे. कारण पंजाबचा एक गोलंदाज ऋतुराजच्या मार्गात मोठा अडथळा आहे. अर्शदीप सिंह हा पंजाब किंग्सचा अनुभवी, प्रतिभावान गोलंदाज आहे. त्याच्याविरोधात ऋतुराज गायकवाडची कामगिरी फारशी चांगली नाहीय.
आयपीएलच्या पीचवर ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंह फक्त आठ चेंडूंपुरता आमने-सामने आले आहेत. पण या आठ चेंडूंमधून कोण कोणावर किती भारी पडतो, ते आकड्यांवरुन कळतं. अर्शदीपने ऋतुराज गायकवाडचा आठ चेंडूत दोनवेळा विकेट घेतला आहे. दोनच्या सरासरीने त्याला फक्त चार धावा करु दिल्यात. पाच चेंडू डॉट टाकलेत. हाच रेकॉर्ड आजच्या सामन्यात कायम राहिला, तर CSK ला चांगली सुरुवात मिळणं मुश्किल आहे.