मुंबई: IPL 2022 आधी विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची कॅप्टनशिप सोडली. एमएस धोनीने (MS Dhoni) सुद्धा या सीजनआधी कॅप्टनशिप सोडून रवींद्र जाडेजाकडे धुरा सोपवली. विराट, धोनी प्रमाणे रोहित शर्मा (Rohit sharma) सुद्धा आता मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कॅप्टनशिप सोडणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामते रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप सोडू शकतो. विराट कोहली प्रमाणे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडू शकतो, असं विधान संजय मांजरेकर यांनी केलं आहे. मांजरेकर एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी मुंबई इंडियन्स संघासाठी नव्या कॅप्टनचाही पर्याय सुचवला आहे. रोहित शर्माने कॅप्टनशिप सोडली, तर त्याजागी कायरन पोलार्डकडे मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सोपवावं, असं संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
“कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या संघात महत्त्वपूर्ण योगदान देत आलाय. विराट कोहलीप्रमाणे रोहित शर्मा सुद्धा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप सोडू शकतो, असं मला वाटतं. यामुळे रोहित शर्मावरील दबाव कमी होईल व फलंदाज म्हणून तो जास्त योगदान देऊ शकतो. पोलार्ड एक चांगला कॅप्टन आहे. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी सोपवली पाहिजे” असं संजय मांजरेकर ईएसपीएन क्रिकेइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
मागच्या तीन-चार सीजनपासून रोहित शर्मा चांगलं प्रदर्शन करत नाहीय. त्याच्या फलंदाजीची सरासरी 30 पेक्षाही कमी आहे. “रोहित शर्मा भारतासाठी खेळतो, तेव्हा त्याचे आकडे शानदार असतात. कारण तो स्वत:बद्दल जास्त आणि संघाबद्दल कमी विचार करतो. आयपीएलमध्ये खेळताना एंकर रोल निभावण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सध्या पंजाब किंग्ससाठी केएल राहुल आणि गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पंड्या हे काम करत आहे. रोहित शर्मा मुक्तपणे खेळला, तर भारतासाठी खेळणारा फलंदाज दिसेल” असं संजय मांजरेकर म्हणाले.
चालू सीजनमध्ये रोहित शर्मा पहिल्या चार सामन्यात फ्लॉप ठरला आहे. 20 च्या सरासरीने त्याच्या बॅटमधून फक्त 80 धावा निघाल्या आहेत. एकही अर्धशतक त्याने झळकावलेलं नाही. मागच्या पाच सीजनमध्ये रोहितच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. रोहित शर्मा सारख्या खेळाडूने 30 पेक्षाही कमी सरासरीने धावा केल्या आहेत. 2019 मध्ये रोहितने 400 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितला अशी कामगिरी करता आलेली नाही.