मुंबई: रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत बाद फेरीचे सामने रविवारपासून सुरु झाले आहेत. क्वार्टर फायनलमध्ये आठ संघ आमने-सामने आहेत. टीम इंडियातून (Team India) खेळलेले खेळाडू रणजी स्पर्धेत खेळत आहेत. IPL 2022 मध्ये दमदार खेळ दाखवणारे हे प्लेयर्स रणजीमध्ये मात्र फ्लॉप झाले आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी शुभमन गिलची भारतीय संघात निवड झाली आहे. शुभमन गिल आयपीएल 2022 चा चॅम्पियन संघ Gujarat Titans चा भाग आहे. गुजरातकडून तो सलामीला येत होता. रणजीमध्ये शुभमन गिल पंजाबसाठी खेळतोय. मध्य प्रदेशविरुद्ध पंजाबचा सामना सुरु आहे. गिल रणजीमध्ये अजिबात प्रभावी ठरला नाही. फक्त 9 धावा करुन पुनित दातेच्या चेंडूवर आऊट झाला.
पृथ्वी शॉ सुद्धा भारतीय संघाचा भाग होता. पण तो सध्या टीम बाहेर आहे. रणजी करंडक स्पर्धेत तो मुंबईच कर्णधारपद भूषवतोय. मुंबईची मॅच उत्तराखंड विरुद्ध आहे. पृथ्वी शॉ रणजीमध्ये विशेष काही करु शकला नाही. 21 धावांवर तो क्लीन बोल्ड झाला. मुंबईकडून बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला. 36 धावांवर मुंबईची पहिली विकेट गेली. दीपक धापोलने त्याला आऊट केलं.
पृथ्वी शॉ प्रमाणे मयंक अग्रवालही टीम इंडियाचा भाग होता. पण त्याला सुद्धा संघात स्थान मिळालेलं नाही. मयंक आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सचा कॅप्टन होता. कॅप्टनशिप आणि फलंदाजी दोघांमध्ये तो फ्लॉप ठरला. त्याला आपली छाप उमटवता आली नाही. रणजी करंडक स्पर्धेत तो कर्नाटककडून खेळतोय. उत्तर प्रदेशविरुद्ध त्यांचा सामना आहे. मयंकने 41 चेंडूचा सामना केला पण अवघ्या 10 रन्सवर आऊट झाला. मयंकला शिवम मावीने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
पृथ्वी शॉ चा सहकारी आणि IPL 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून फायनल खेळणारा यशस्वी जैस्वाल सुद्धा मोठी इनिंग खेळू शकला नाही. चांगली सुरुवात केली. पण 35 धावांवर तो आऊट झाला. 45 चेंडूंचा सामना करताना त्याने सहा चौकार लगावले.