मुंबई : पंजाब किंग्सचा संघ (KXIP) इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) संक्रमणाच्या स्थितीमध्ये आहे. केएल राहुलने पंजाबची साथ सोडली व लखनौ सुपर जायंट्सचं कर्णधारपद स्वीकारलं. पंजाबने आता मयंक अग्रवालला आपलं कॅप्टन बनवलं आहे. अनिल कुंबळे या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मागच्या महिन्यात पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाब संघाची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यामते पंजाब संघाच्या नव्या कर्णधारासमोरचं आव्हान सोपं नसणार आहे. आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाची कामगिरी फार चांगली नाहीय. आयपीएलच्या 14 पैकी फक्त दोन सीजनमध्येच त्यांना प्लेऑफची फेरी गाठता आली. 2008 आणि 2014 मध्ये त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सातव्या सीजनमध्ये पंजाब संघाला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं. 2014 पासून दोनवेळा पंजाबचा संघ तळाला राहिला आहे. स्टार स्पोर्टसवरील कार्यक्रमात सुनील गावस्कर यांनी पंजाब संघ आणि नवीन कॅप्टन मयंक समोर किती खडतर आव्हान आहे, त्याविषयी आपलं मत व्यक्त केलं.
कधी पोहोचला होता पंजाबचा संघ फायनलमध्ये
“पंजाब संघासाठी पुढचं लक्ष्य सोपं नाहीय. हा एक असा संघ आहे, ज्यांनी अनेक वर्ष आपल्या टॅलेंटसोबत न्याय केलेला नाही. त्याचं कारण आपल्याला माहित नाही. T 20 फॉर्मेटमध्ये तुम्हाला काही प्रमाणात भाग्याची साथ लागते. बाद फेरी किंवा फायनलपर्यंत पोहोचल्यानंतर कदाचित ते आयपीएलचं जेतेपद मिळवू सुद्धा शकतात” असं गावस्कर म्हणाले. 2014 मध्ये एकदा पंजाबचा संघ आयपीएल फायनलमध्ये पोहोचला होता.
कागदावर बळकट टीम
मागच्या महिन्यात मेगा ऑक्शनच्या टेबलावर किंग्स इलेव्हन पंजाबने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांचं भरपूर कौतुकही झालं. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हींगस्टोन, शिखर धवन आणि शाहरुख खान या खेळाडूंना पंजाबने विकत घेतलं. कागदावर तरी पंजाबचा संघ बळकट वाटतोय. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर 27 मार्चपासून रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आयपीएलमधील अभियानाला सुरुवात होत आहे.