मुंबई: उद्या होणाऱ्या IPL मेगा ऑक्शनआधीच किंग्ज इलेव्हन पंजाब (Punjab Kings) संघाला मोठा धक्का बसला आहे. वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. ते किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. 2019 पासून ते किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या अन्य सपोर्ट स्टाफसोबत काम करत होते. संघातील खेळाडूंना फलंदाजीचे बारकावे शिकवत होते. अभिनेता रणबीर कपूरचा फोटो पोस्ट करुन वसीम जाफर यांनी खास त्यांच्या स्टाइलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदावरुन पाय उतार होत असल्याची माहिती दिली. वसीम जाफर यांच्याकडे 150 रणजी सामन्यांना अनुभव आहे. देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन 2019 मध्ये त्यांना किंग्ज इलेव्हनज पंजाबचं फलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आलं होतं. अनिल कुंबळे किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक आहेत. डॅमियन राइट टीमचे गोलंदाजी आणि जॉन्टी रोड्स संघाचे फिल्डिंग कोच आहेत.
गमतीशीर पोस्ट करुन दिला राजीनामा
एक गमतीशीर पोस्ट करुन वसीम जाफर यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. रणबीर कपूरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातील ‘अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना’ हा फोटो त्यांनी पोस्ट केला. अनिल कुंबळे व पूर्ण टीमला त्यांनी IPL 2022 च्या सीजनसाठी शुभेच्छा दिल्या.
Adios, and thank you @PunjabKingsIPL, it’s been a pleasure. Wishing @anilkumble1074 and the team very best for #IPL2022 ? pic.twitter.com/rDivb0akZp
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 10, 2022
लिलावासाठी पंजाबच्या पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटी
आयपीएलच्या पहिल्या म्हणजे 2008 च्या सीजनमध्ये वसीम जाफर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळले होते. आयपीएलच्या सहा सामन्यात त्यांनी 19.16 च्या सरासरीने एकूण 115 धावा केल्या. आयपीएल लिलावाच्यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटी रुपये आहेत. त्यांनी मयंक अग्रवाल 12 कोटी आणि अनकॅप्ड गोलंदाज अर्शदीप सिंह यांनाच फक्त रिटेन केलं आहे. त्यामुळे जास्त पैसे मोजून अनेक मोठे खेळाडू विकत घेण्याची त्यांना संधी आहे. IPL 2022 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला केएल राहुलला कर्णधारपदी कायम ठेवायचं होतं. पण त्यानेच संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.