CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्ससाठी मागचा सीजन एका वाईट स्वप्नासारखा होता. टीमने 14 पैकी फक्त चार सामने जिंकले. पॉइंट्स टेबलमध्ये सीएसकेची टीम नवव्या स्थानावर होती. सीएसके या सीजनमध्ये सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. सीएसकेच्या विजयासाठी ऋतुराज गायकवाडची बॅट चालणं आवश्यक आहे. ऋतुराज गायकवाडवर महेंद्र सिंह धोनीचा खूप विश्वास आहे. धोनीच्या या मॅचविनर प्लेयरवर माजी भारतीय खेळाडू आकाश चोपडाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.
आकाश चोपडाने अलीकडेच आपल्या यूट्यूब चॅनलवर ऋतुराज गायकवाडबद्दल भाष्य केलं. वर्ष 2022 मध्ये गायकवाडची बॅट जास्त चालली नाही. ऋतुराजला आपल्या बॅटिंगमध्ये काही आवश्यक बदल करण्याची गरज आहे, असं आकाश चोपडा म्हणाला.
बॅटिंग डीजल इंजन कारसारखी
“गायकवाड ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्याने फार काही साध्य होणार नाही. त्याला काही बदल करावे लागतील” असं आकाश चोपडा म्हणाला.
“गायकवाडला आपल्या बॅटिंगमध्ये जास्त आक्रमकता आणावी लागेल. सध्या गायकवाडची बॅटिंग डीजेल इंजिन असलेल्या कारसारखी आहे. धीम्यागतीने सुरुवात होते. हळू-हळू स्पीड पकडते. गायकवाड धीम्यागतीने सुरुवात करतो आणि हळू-हळू आक्रमक फलंदाजी सुरु करतो. गायकवाडने इलेक्ट्रिक कारसारखी तात्काळ सुरु होऊन वेग पकडण्याची गरज आहे” असं आकाश चोपडा म्हणाला.
16.25 कोटींना विकत घेतलेल्या खेळाडूवर प्रश्नचिन्ह
आकाश चोपडाने बेन स्टोक्सच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलय. चेन्नईने 16.25 कोटी रुपये खर्च करुन या खेळाडूला विकत घेतलं होतं. बेन स्टोक्स चेन्नईच्या पीचवर किती उपयुक्त ठरतो, ते पहाव लागेल. स्टोक्सला टॉप ऑर्डरमध्ये खेळणं आवडतं. तिथे तो वेगाने धावा करतो. या लीगमध्ये टॉप ऑर्डरमध्ये असतानाच त्याने एकमेव शतक झळकावलं होतं. चोपडा यांच्या मते स्टोक्स रॉबिन उथप्पाची जागा घेऊ शकतो.